पठ्ठ्या दोन बिबट्याशी झुंजला !

सांगली: वृत्तसंस्था । मांगले येथील बांबर डोंगर परिसरात उसाच्या शेतात दोन बिबट्यांनी तरुणावर हल्ला केला. तरुणाने मोठ्या धैर्याने बिबट्यांशी झुंज देत हल्ला परतवून लावला. आदिनाथ शेवडे ( वय २५, रा. शेवडे वस्ती, मांगले, ता. शिराळा) याला मांगले प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल आहेे.

सुदैवाने वेळीच लोकांनी आरडाओरडा करीत मदतीसाठी धाव घेतल्याने बिबट्यांनी धूम ठोकली. . गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात बिबट्यांची दहशत वाढली आहे.

आदिनाथ शेवडे याचे घर मांगले येथील शेवडे वस्तीवर आहे. घरापासून जवळ जनावरांचे शेड आहे. आदिनाथ दूध घालण्यासाठी गावातील डेअरीत गेला होता. परत आल्यानंतर त्याला घराच्या मागे उसातून कुत्रे भुंकत असल्याचा आवाज आला. घरात जाण्यापूर्वी तो आवाजाच्या दिशेने निघला. घराच्या पाठीमागे जाताच उसात दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांपैकी एक बिबट्या आदिनाथच्या अंगावर धावून आला. आदिनाथने हातातील दुधाची रिकामी किटली बिबट्याला तोंडावर मारत त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुसऱ्या बिबट्याने आदिनाथवर झेप घेतली. बचाव करताना आदिनाथ पाय घसरून खाली पडला. बिबट्याच्या नख्यांचे ओरखडे त्याच्या छातीवर उटले. दुसऱ्या बिबट्याने त्याचा शर्ट तोंडात पकडून खेचण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर पडलेल्या स्थितीत त्याने रिकाम्या किटलीने दोन्ही बिबट्यांना हुसकावण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. आरडाओरडा केल्याने वस्तीवरील लोकांनी उसाकडे धाव घेतली. दोन्ही बिबट्यांनी उसातून पळ काढला.

अचानक घडलेल्या घटनेने आदिनाथ बेशुद्ध पडला. नातेवाइकांनी त्याला मांगले प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. काही वेळानंतर तो शुद्धीवर आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र घड्याळे यांनी उपचार केले. त्याच्या छातीवर जखम झाली असून, डावा हात मोडला आहे,

. मांगले परिसरात महिनाभरात बिबट्यांकडून हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. पूर्ण वाढ झालेल्या दोन बिबट्यांसह त्याच्या दोन बछड्यांचा वावर या परिसरात आहे. मानवी वस्तीत येणाऱ्या बिबट्यांना जेरबंद करून जंगलात सोडावे, अशी मागणी लोकांनी वन विभागाकडे केली आहे.

मांगले परिसरात वावरणाऱ्या बिबट्यांपैकी एक बिबट्या गुरुवारी वनविभागाने लावलेल्या सापळ्यात जेरबंद झाला आहे. नंतर आणखी दोन बिबटे बांबर डोंगरातून गावाच्या दिशेने येत असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले होते. वस्तींवरील जनावरांना धोका वाढला असून, रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडण्याची भीती वाटत असल्याचे लोक सांगतात.

Protected Content