ज्याने तिरंग्याचा अपमान केला त्याला पकडा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । प्रजासत्ताक दिनी झालेल्या तिरंग्याच्या अपमानानं देश दुःखी झाला, या पंतप्रधानांच्या विधानावरून शेतकरी नेते राकेत टिकैत यांनी मोदींवर टीका केली. ”सर्व देश तिरंग्यावर प्रेम करतो. ज्याने तिरंग्याचा अपमान केला आहे, त्याला पकडावं,” अशा शब्दात टिकैत यांनी मोदीवर पलटवार केला.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे पडसाद अजूनही उमटत आहेत. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाल्यानंतर लाल किल्ल्यावरही तणाव निर्माण झाला होता. या संपूर्ण घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली होती. तिरंग्याचा अपमानामुळे देश दुःखी झाल्याचंही पंतप्रधान म्हणाले. त्यावरून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पलटवार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’मध्ये मोदींनी देशभरातील वेगवेगळ्या घटनांबद्दल भाष्य केलं होतं. यात भारताने कोरोनाविरोधात दिलेली लढाई जगासमोर एक उदाहरण ठरलं, तसंच आता लसीकरणही ठरतंय, असं मोदी यांनी नमूद केलं.

कृषी कायद्यांवरून शेतकरी व सरकारमध्ये पुन्हा चर्चा करण्याबद्दलही टिकैत यांनी भूमिका मांडली. “कोणतीही चर्चा दडपणाखाली होणार नाही. आम्ही या विषयावर चर्चा करू. ते आमचेही पंतप्रधान आहेत. त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही आभारी आहोत. त्यांनी आमच्या लोकांना सोडावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही त्यांचा आदर करू,” असं टिकैत म्हणाले.

“आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार वारंवार करीत आहे. तिन्ही कृषी कायदे स्थगित ठेवण्याचा सरकारचा प्रस्ताव आजही कायम आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. शेतकऱ्यांनी केवळ एक दूरध्वनी करावा, आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत,” असं मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केलं होतं.

Protected Content