जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी नागरीकांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा- जिल्हाधिकारी

जळगाव– जळगाव जिल्ह्यातून ज्या नागरीकांना परराज्यात अथवा इतर जिल्ह्यांमध्ये जायचे असेल त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरीकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार गेल्या दिड महिन्यापासून अडकून पडलेल्या नागरीकांचा आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ज्या नागरीकांना जिल्ह्याबाहेर जायचे असेल त्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा. या अर्जात नागरीकांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कोणत्या ठिकाणी जायचे त्याची माहिती, आधारकार्डची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज दोन छायाचित्रे, वाहन नेणार असल्यास वाहनाचा क्रमांक, वाहनचालकाचे नाव, प्रवासाचा मार्ग आदि माहिती असणे आवश्यक आहे. सदरची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकत्रित केली जाईल. त्यानंतर ती यादी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवतील. त्यानंतर जिल्हाधिकारी या नागरीकांना जाण्यासाठी पत्र देणार आहे. जिल्हाधिकारी यांचे पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीना कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यानांच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल. लक्षणे असल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांचेवर वैद्यकीय उपचार करण्यात येतील.

वाहतुकीला वापरण्यात येणारी वाहने जंतुनाशकांनी फवारलेली असावी तसेच वाहनात देखील सोशल डिस्टेंसिंग पाळावे लागणार आहे. त्यानुसार किती लोक वाहनाने जाणार आहे त्याप्रमाणे परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन कालावधीत राहावे लागणार आहे. जिल्ह्यात आलेल्या सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर सबंधित व्यक्तीस घरीच क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल तसेच त्यांना केंद्र शासनाचे आरोग्यसेतू मोबाईल एप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल जेणे करून त्यांना कायम संपर्कात ठेवता येईल. असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे सांगितले आहे.

Protected Content