जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री

 

जळगाव : प्रतिनिधी । कोरोनाला हद्दपार करण्याबरोबरच सर्वांगीण विकास करुन जिल्हा विकासात अग्रेसर राहील, याकरीता प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 74 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

 

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी नेहा भोसले, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती गाजरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, तहसीलदार सुरेश थोरात यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, कोरोनायोध्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय ‍विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

यावेळी पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याकरीता अनेकांनी बलीदान दिले अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. या स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वांगीण प्रयत्नांमुळेच स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्यासाठी ही मोठी अतुलनीय बाब आहे. भारताच्या स्वातंत्र्याबरोबर जगातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. या देशांनी सुरवातीला लोकशाहीचा स्वीकार केला. कालांतराने या देशांना लोकशाहीची मूल्य जोपासता आली नाहीत. ती मूल्ये आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाने जोपासली आहेत. त्यामुळेच भारतासारखा विशालकाय देश एकसंघ राहू शकला. ही सर्व कमाल आपल्या लोकशाहीची आहे. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास सुरुवात करून लोकशाहीला आणखी बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

पालकमंत्री पुढे म्हणाले की, मागील काळात जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत होता. जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे आता तो कमी झाला आहे. मात्र, दुसरे संकट आपल्यासमोर निर्माण होवू पाहत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिली आहे. माझा बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. जून, जुलैत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, ऑगस्टच्या 15 दिवसानंतरही पाऊस रुसलाच आहे. असेच चित्र राहिले, तर नैसर्गिक आपत्ती ओढावण्याची चिन्हे आहेत. मात्र, शेतकरी, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

जिल्ह्यात खरीप हंगामात विविध पिकांची चांगल्याप्रकारे पेरणी झाली आहे. त्यासाठी लागणारी खते मुबलक उपलब्ध आहे. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडलेला आहे. पीकांसाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने आपण सर्वजण वरूण राजाला साकडे घालू या. याबरोबरच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हावासीयांना केले.

आजपासून जळगाव जिल्ह्यासह राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. या प्रकल्पामुळे खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होवू शकणार आहे. यामुळे पीक कर्ज, पीक विमा योजना राबविणे किंवा पीक नुकसान भरपाई अदा करणे शक्य होणार आहे. याबरोबरच महसूल विभागाचा कणा असलेल्या तलाठी बांधवावरील कामाचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री महोदयांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेसाठी ई-पीक पाहणी उपयुक्त ठरणार आहे. आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल विक्री सुलभीकरणासाठी ई-पीक पाहणी ॲप उपयुक्त ठरणार आहे. पीक माहितीच्या आधारे शासनस्तरावर कृषीविषयक कार्यक्षम धोरण आखण्यास मदत होणार असून हवामान, किडींचा प्रादुर्भाव व इतर रोगांवरील उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांना तातडीने संदेश देणे शक्य होणार आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सन 21-22 करीता 536 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे. मात्र, यंदा कोरोना विषाणूमुळे राज्याच्या उत्पन्नातही घट झाली आहे. त्यामुळे एकूण आराखड्याच्या 60 टक्के निधी उपलब्ध होणार असून या निधीतून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यात येईल. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. काही प्रकल्प कार्यरत झाले असून काहींचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा व ग्रामीण रुग्णलयात ऑक्सिजन पाईपलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात 17 हजार 461 खाटांचे व्यवस्थापन केले आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात बालरुग्ण कक्ष सुरु केला आहे. व्हेन्टीलेटर व आयसीयु खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोगय केंद्रात दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध आहेत. 14 लाखापेक्षा अधिक नागरीकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत आतापर्यंत जिल्ह्यात 11 लाख कोविड लसीचे डोस देण्यात आले आहे. आठ लाखापेक्षा अधिक नागरीकांना पहिला तर अडीच लाखापेक्षा अधिक नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. काही घरांमध्ये पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला. आई-वडिल गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 20 असून एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 510 एवढी आहे. या बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. या कुटुंबांना प्राथमिक टप्प्यात अन्नधान्य, किराणा, कपडे, शालेय साहित्य, बि-बियाण्याचा पुरवठा करण्यात आला. या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

लॉकडाऊन कालावधीत बांधकाम मजूर, घरेलू कामगार, ॲटोरिक्षा चालकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने भरीव मदत जाहीर केली होती. त्यानुसार जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून 43 हजार 357 नोंदीत कामगारांना 8 कोटी 92 लाख 8 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य थेट बँक खात्यात जमा केले. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत 2 हजार 723 कामगारांना 40 लाख 84 हजार 500 रुपयांची मदत केली. नोंदीत 1 हजार 628 माथाडी कामगारांना 32 लाख 56 हजार रुपयांची मदत केली. नोंदीत सुरक्षा रक्षकांना 1 हजार रुपये अतिरिक्त वाहन भत्ता मंजूर केला. एकूण 538 सुरक्षा रक्षकांना 5 लाख 38 हजार रुपयांची मदत केली. 4 हजार 137 ॲटोरिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी 1500 याप्रमाणे 62 लाख 5 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य संबंधितांच्या बँक खात्यात जमा केले आहे.

लॉकडाऊन काळात नागरीकांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत 8 लाख 10 हजार 295 मनुष्य दिवसांची निर्मिती करण्यात आली असून याकरीता 23 कोटी 27 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे खावटी योजनेतंर्गत 70 हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून आतापर्यंत 60 हजार लाभार्थ्यांना लाभाचे वाटप केले आहे. तर शासकीय आश्रमशाळांमार्फत आदिवासी विद्यार्थी, गरजू मजुरांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील अंत्योदय लाभार्थ्यांना 35 किलो, प्राधान्य कुटूंब योजनेतून प्रत्येक लाभार्थ्याला 5 किलो तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 5 किलो धान्य मोफत देण्यात आले.  नवसंजीवनी योजनेतंर्गत यावल तालुक्यातील 7 गावांना 4 महिन्याचे धान्य पावसाळ्यापूर्वीच रवाना करण्यात आले. जिल्ह्यातील कोणीही गरीब व गरजू अन्नापासून वंचित राहू नये याकरीता जिल्ह्यात 47 शिवभोजन केंद्रामार्फत दररोज 4 हजार 500 थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. शिवभोजन योजना सुरु झाल्यापासून आजपावेतो जिल्ह्यात 17 लाख 4 हजार 990 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष सहाय्य योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लाख 45 हजार 672 लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेतंर्गत 85 कोटी 56 लाख 58 हजार 700 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.

जिल्ह्यात वैयक्तीक लाभाच्या योजना गरजुंपर्यंत पोहचविण्यासाठी प्राधान्य देत असतांनाच सिंचन, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण या सुविधांवर भर देऊन नागरीकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात येत आहे. जळगाव पोलीस दलाला जिल्हा नियोजन समितीमार्फत 29 चारचाकी तर 38 दुचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

जलजीवन मिशनच्या माध्यमातून 2024 पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ठ पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. याकरीता राज्यासाठी 13 हजार कोटींचा तर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील 2025 गावांसाठी 3 हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी 1200 कोटी रूपयांची तरतूद केली असून स्वच्छता विभागातर्फे घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी 314 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गाव आत्मनिर्भर झाले असून यापुढील काळात जळगाव जिल्ह्यातून कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी माझ्यासह सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा कटिबध्द आहेतच. मात्र, यासाठी राज्य शासनाच्या विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन जिल्हावासीयांनीही प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्यांचा पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नेहरु युवा केंद्रातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ (सन 2019-2020) पुरस्कार तुळजाई बहुउद्देशीय संस्था यांना प्रदान केला.

पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह – सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील, लिलाकांत महाले, पोलीस हवालदार विजय काळे, शशिकांत पाटील, सुनिल दामोदरे , पोलीस नाईक महेश पाटील, संदीप सावळे, पोलिस महासंचालकाचे विशेष सेवा पदक – पोलिस शिपाई अतुल  मोरे यांना प्रदान करण्यात आले  त्याचप्रमाणे महा आवास अभियान ग्रामीणमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था उत्कृष्ट क्लस्टर रामजीपाडा, ग्रामपंचायत, अडावद, ( ता. चोपडा) .  प्रधानमंत्री आवास योजना जिल्हास्तरीय पुरस्कार- सर्वोत्कृष्ठ तालुका- प्रथम क्रमांक मुक्ताईनगर, व्दीतीय क्रमांक भुसावळ, तृतीय क्रमांक चाळीसगाव. राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ठ तालुका प्रथम क्रमांक मुक्ताईनगर, द्वीतीय क्रमांक एरंडोल, तृतीय क्रमांक बोदवड यांचा गौरव करण्यात आला

कृषि पर्यवेक्षक किशोर  साळुंखे, ( एरंडोल) . कृषी सहाय्य्क  तुफान खोत  (चाळीसगाव) . श्रीमती वैशाली पाटील (भडगाव).  कृषी पर्यवेक्षक  पांडूरंग महाजन ( पाचोरा), कृषी सहाय्य्क तुळशीराम पवार,(चाळीसगाव), अमोर पाटील, (जामनेर)  यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जळगाव पोलीस दलाच्या पथकाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3 च्या आवारातही वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होंशिग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, सहायक मुद्रांक अधिकारी सुनील पाटील, कृषि अधिकारी कुर्बान तडवी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, आंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Protected Content