जळगाव, प्रतिनिधी । लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, इतर नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार ज्या नागरिकांना परराज्यातून अथवा इतर जिल्ह्यांतून जळगाव जिल्ह्यात यायचे व जायचे असेल त्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली अाहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार व जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी व त्यांची टीम सुट्टीच्या दिवशीही आॅनलाईन पध्दतीने परवाने देण्याची मोहीम राबवित आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात येणाऱ्यांची व जिल्ह्यातून जाणा-यांची सोय झाली आहे. शनिवार, रविवार सुटीचा दिवस असतांनाही जिल्हा प्रशासन परवाने देण्याची मोहीम राबवली. यासाठी जिल्ह्यात येणा-यांसाठी उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील यांची तर जिल्ह्यातून इतर राज्यांत व जिल्ह्यात जाण्यासाठी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे हे नोडल अधिकारी आहेत. शनिवार २ मेपासून परजिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी व जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी, ऑनलाईन परवानगी कशी घ्यावी लागते हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. सुमारे सहा हजारापेक्षा अधिक नागरिकांनी आजअखेरपर्यंत अॉनलाईन अर्ज केले आहेत.
जिल्ह्यात बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून येण्यास परवानगी दिलेले नागरिक असे
राज्य –संख्या
गुजरात –३५५३
राजस्थान– ११९
मध्यप्रदेश- -४०
झारखंड- -८ तर इतर नागरिक महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले आहेत. यामध्ये नाशिक, धुळे, औरंगाबाद, नंदूरबार, बुलडाणा मुंबई, पुणे, गडचिरोली, अहमदनगर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
जिल्ह्यातून बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी दिलेले नागरिक
नाशिक- -५१९
धुळे –२३३
औरंगाबाद–९८
अहमदनगर- -९६
इतर–४७ याप्रमाणे आहेत. बाहेरील राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी त्याबाबत तलाठी, तहसिलदार, प्रांताधिकारी, पोलिस यांना कळवायचे आहे. तसेच आल्यानंतर तालुक्यातील आरोग्य केंद्रातून स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यायची आहे. स्वतः १४ दिवस होम क्वारंटाईन व्हायचे आहे. असे न करणाऱ्या व्यक्तींची माहिती गावातील लोकांनी प्रशासनाला कळवायची आहे. त्यांची नावे गोपनीय ठेवले जातील. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीनी असे न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी कळविले आहे.