जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा अभिमान बाळगा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, प्रतिनिधी | अनेक अडचणींवर मात करून जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. येथून शिकलेले विद्यार्थी हे आयुष्यात यशस्वी बनत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. यामुळे आपण जि. प. शाळांमध्ये शिकत व शिकले असल्यास याचा अभिमान बाळगावा असे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.ते सुभाषवाडी येथील जि.प. शाळेच्या वॉल कंपाऊंडसह व्यायामशाळेतील साहित्याचे लोकार्पण करतांना बोलत होते.

 

याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून यशस्वीपणे सांभाळली जात असल्याबद्दल कौतुक केले. तर जगातील प्रत्येक संपत्ती चोरीस जाण्याचा धोका असला तरी शरीर संपत्ती ही कुणीही चोरू शकत नसल्याचे नमूद करत व्यायामाचे महत्व अधोरेखीत केले. दरम्यान, तालुक्यातील वराड बुद्रुक येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते जि.प. शाळेच्या सुरक्षा भिंतीचे लोकार्पण, शिवसेना शाखा उदघाटन, कब्रस्थान वॉल कंपाउंडचे भूमिपुजन, गावांतर्गत कॉंक्रीटीकरणाचे भूमिपजून आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील सुभाषवाडी आणि वराड बुद्रुक या दोन गावांमध्ये विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पणपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात सुभाषवाडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेला पालकमंत्री सुरक्षा भिंत योजनेच्या अंतर्गत बांधलेल्या वॉल कंपाऊंडचे लोकार्पण आणि व्यायामशाळेत दिलेल्या साहित्याचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुका प्रमुख राजू चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, संजय गांधी योजना तालुकाध्यक्षरमेश पाटील, रोहयो चे तालुकाध्यक्ष रवी कापडणे, सरपंच राजाराम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सिताराम राठोड, मधुकर राठोड आणि श्रावण राठोड, शाखा प्रमुख रामलाल चव्हाण, ज्ञानेश्‍वर राठोड, संजय राठोड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश पाटील यांनी केले, तर आभार उपसरपंच संदीप सुरळकर यांनी मानले.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही गावांमधील पाणी समस्या कायमची निकाली काढण्यासाठी पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती देण्यात आली असल्याचे सांगितले. आपण राजकीय हेतू मनात ठेवून नव्हे तर गावाची गरज पाहून विकासकामांना प्राधान्य देतो. यामुळे कमी मते मिळालेल्या गावांना निधी देतांना आपण दुजाभाव करत नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. तर वराड बुद्रुक येथील उपसरपंच संदीप सुरळकर यांनी देशसेवेसोबत आपल्या गावाच्या विकासाचा विडा उचलला असल्याचे नमूद करत त्यांचे विशेष कौतुक केले. वावडदा ते रोटवद हा महत्वाचा रस्ता मंजुरीच्या मार्गावर असून याचा परिसरातील गावकर्‍यांना लाभ होणार असल्याचे ना. पाटील यांनी नमूद केले. यासोबत दोन्ही गावांना ग्रामपंचायतींचे कार्यालय बांधून देण्यासाठी आपण कटीबध्द असून मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक, दोन्ही गावांमधील शाळांसाठी आमदार निधीतून संगणक आणि प्रिंटर देणार असल्याच्या घोषणा ना. गुलाबराव पाटील यांनी केल्या.

दरम्यान, वराड बुद्रुक येथील कार्यक्रमात वॉल कंपाऊंडचे लोकार्पण; दहा लक्ष निधीची तरतूद असणार्‍या कब्रस्थानाचे भूमिपुजन, गावांतर्गत कॉंक्रीटीकरणाचे भूमिपजून आणि शिवसेना शाखेचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर याच कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना याच्या कागदपत्रांचे वाटप देखील ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आत्मा समितीचे तालुकाध्यक्ष पी. के पाटील यांनी केले. तर, आभार सरपंच राजाराम चव्हाण यांनी मानले.

Protected Content