जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी २८ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करता येणार

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी 28 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन प्रस्ताव सादर करता येणार आहे. यामुळे तातडीने प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (एका व्यक्तीस), गुणवंत खेळाडू पुरस्कार (एक महिला, एक पुरुष, एक दिव्यांग खेळाडू) देण्यात येणार आहेत. त्यासाठी १४ ते २८ डिसेंबर २०२१ या कालावधीत jalgaonsports.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. क्रीडा पुरस्कारांची नियमावली २४ जानेवारी २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली असून ती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दहा हजार रुपये रोख, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी १ जुलै २०११ ते ३० जून २०२१ या कालावधीतील, तर गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी १ जुलै २०१६ ते ३० जून २०२१ या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच २८ डिसेंबर २०२१ पर्यंत हार्ड कॉपी कार्यालयात जमा करणे आवश्यक राहील. ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत अधिक माहितीसाठी सुजाता गुल्हाने (9763231146) यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहिती, विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव) येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

Protected Content