जामनेर तालुक्यात भरणार बंजारा समाज बांधवांचा महाकुंभ

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा |  जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभाकरिता  देशभरातून अंदाजे दोन ते अडीच लाख भाविक येतील. त्यामुळे या कार्यक्रमस्थळी येणा-या भाविकांसाठी सर्व व्यवस्था चोखपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

सह्याद्री अतिथगृहावर उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होणा-या ‘अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३’ बाबत पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस बोलत होते. या महाकुंभामध्ये अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना -नायकडा समाजांचा धर्म, इतिहास संस्कृती प्रथा-पंरपरा यांवर आधारित भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमासाठी देशभरातून विख्यात संत महंत तसेच समाजातील नागरिक सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय धर्म जागरण विभाग कार्यक्रमासाची पुर्वतयारी करण्या बरोबरच समन्वयाची भूमिका पार पाडत आहे. सदर कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश , तेलंगणा तसेच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर समाजातील लोक सहभागी होणार असल्याचे संयोजन समितीचे वतीने सांगण्यात आले.

या बैठकीला ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, औषध प्रशासन मंत्री ना. संजय राठोड, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधानसचिव (परिवहन) पराग जैन नानोटिया,प्रधानसचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे, अन्न व प्रशासनचे (आयुक्त) अभिमन्यू काळे, उपमुख्य मंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, बांधकाम विभागाचे सचिव एस. एस.साळुंखे, जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल,  जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, या कार्यक्रमासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येतील त्यामुळे कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे देण्यात याव्यात.  देशभरातून या कार्यक्रमासाठी येणा-या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी चांगले नियोजन करा. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सर्व विभागातील कामांच्या समन्वयासाठी जिल्ह्याचे पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून भाविकांना एक चांगला अनुभव घेता आला पाहिजे अशा सुविधा सर्व यंत्रणांनी द्याव्यात.सार्वजनिक बांधकाम विभाग,पाणीपुरवठा विभाग,ऊर्जा विभाग,ग्रामविकास विभाग,गृह विभाग यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारी पार पाडाव्यात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास नियोजन समितीमार्फत त्या सोडविण्यात येतील.

श्री.फडणवीस म्हणाले, गोद्री येथील कार्यक्रम स्थळी जाणारे प्रमुख मार्ग सर्व रस्त्यांचे कामे सावर्जनिक बांधकाम विभागाने त्वरीत हाती घेवून पुर्ण करावे. अपुर्ण रस्ते पूर्ण करणे, गोद्री गावात हेलीपॅड तयार करणे, अतिक्रमण काढणे ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.पिण्याच्या  पाण्याची, स्नानगृह, सांडपाणी व्यवस्था करावी. उर्जा विभागाने गोद्री ठिकाणी नवीन व तात्पुरता स्वरुपात ट्रान्सफॉर्मर लावणे, विजेच्या उपक्रेंद्रामध्ये विजेची क्षमता वाढविणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे या कामाला प्राधान्य द्यावे. परिवहन विभागाने कुंभस्थानी तसेच धार्मीक स्थळ गोद्री येथे जाण्यासाठी जादा बसेस सोडाव्यात व गर्दी होवू नये यासाठी वाहतूकीचे नियोजन करावे. ग्रामविकास विभागाने महिला बचत गटाचे स्टॉल लाववावेत, वैद्यकीय सुविधा,कायदा व सुव्यवस्था देखील चोख ठेवावी.

अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी जिल्हाधिकारी अमन मित्तल  यांनी प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत सादरीकरण केले.

Protected Content