जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केल्यानुसार आज सकाळपासून जळगाव महापालिका क्षेत्रासह भुसावळ व अमळनेरमध्ये सक्तीचा लॉकडाऊन सुरू झाला असून याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात यावा म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. असे असले तरी अनेक ठिकाणी कोरोना बाधीतांची संख्या वाढत चालली आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ ते १३ जुलैच्या दरम्यान जळगाव, भुसावळ व अमळनेर शहरात सक्तीचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात अगदी अत्यावश्यक वस्तूंची खरेदी देखील ही संबंधीतांनी आपापल्या परिसरातच करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खूपच गरज असेल तर नागरिकांनी घराबाहेर पडावे. अन्यथा, घरातच राहून या सक्तीच्या लॉकडाऊनचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या अनुषंगाने आज सकाळपासून जळगाव, भुसावळ व अमळनेरमध्ये सक्तीचा लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून यासाठी वाढीव पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.