जळगाव जिल्ह्यात 1 लाख 41 हजार शेतकऱ्यांना 569 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप

जळगाव (प्रतिनिधी) खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध बँकामार्फत पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. राज्य शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बॅका, ग्रामीण बँका, खाजगी बँकांच्या व इतर बँकांच्या माध्यमातून चालू खरीप हंगामासाठी आतापर्यंत 1 लाख 41 हजार 44 शेतकऱ्यांना 569 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना खरीप हंगामात आवश्यक असणारी बी-बीयाणे व खते खरेदी करता यावी तसेच मशागतीची कामे करता यावी याकरीता महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या व इतर शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी पीक कर्ज उपलब्ध होण्याबाबत नियोजन करण्याच्या सुचना राज्य शासनातर्फे सहकार विभागास दिल्या होत्या. त्यानुसार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबत जिल्हा उपनिबंधक श्री. राठोड यांचेशी चर्चा करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज उपलब्ध होईल याबाबत नियोजन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सहकार विभागाने जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती मिळालेले शेतकरी तसेच पीक कर्ज मिळण्यास असणारे शेतकरी यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्ह्यातील बँकर्सची बैठक घेऊन सुचित केले होते.

जिल्ह्यास सन 2020-2021 साठी खरीप कर्ज वाटपाचा 2892 कोटी 68 लाख 23 हजार रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. तर रब्बी हंगामासाठी 447 कोटी 22 लाख 36 रुपयांचा लक्षांक असा खरीप व रब्बी हंगामासाठी एकूण 3339 कोटी 90 लाख 59 हजार रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत खरीप हंगामासाठी 569 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे.

या पीक कर्ज वाटपात सर्वाधिक वाटा हा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचा असून या बँकेने 1 लाख 35 हजार 43 शेतकऱ्यांना 442 कोटी 16 लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांनी 4 हजार 335 शेतकऱ्यांना 69 कोटी 1 लाख 77 हजार रुपये, ग्रामीण बँकांमार्फत 161 शेतकऱ्यांना 1 कोटी 80 लाख 39 हजार रुपये, खाजगी बॅकांमार्फत 1 हजार 505 शेतकऱ्यांना 56 कोटी 15 लाख 27 हजार रुपये याप्रमाणे सर्व बँकामिळून जून, 2020 अखेर 569 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केलेल्या 1 लाख 35 हजार 43 शेतकऱ्यांपैकी 86 हजार 213 कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना 269 कोटी 28 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जुन, 2020 अखेर अपलोड केलेली कर्ज खाती 1 लाख 74 हजार 107 असून विशिष्ट क्रमांकासह कर्ज खाती 1 लाख 59 लाख 837 इतकी आहेत. आधार प्रमाणीकरण झालेली एकूण खाती 1 लाख 50 हजार 673 एवढी आहेत. तर आधार प्रमाणीकरण शिल्लक असलेली खाती 9 हजार 164 एवढी आहेत. तक्रार असलेली एकूण खाती 7 हजार 200 आहेत. जिल्हा तक्रार निवारण समितीद्वारे तक्रार निवारण झालेल्या खात्यांची संख्या 1 हजार 246 असून तहसिलदारांद्वारे तक्रार निवारण झालेली खाती 2 हजार 668, तहसिलदारांकडे तक्रार निवारणासाठी प्रलंबित खाती 1 हजार 36 एवढी आहे. जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत आतापर्यंत एकूण 1 लाख 27 हजार 683 लाभार्थ्यांना 729 कोटी 87 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला असल्याची माहितीही श्री. राठोड यांनी दिली आहे.

Protected Content