पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । जळगाव येथे सुसज्ज आणि अद्ययावत असे वारकरी भवन उभारण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. यासोबत जिल्हा तिथे वारकरी भवन यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. आज पाळधी येथे अ.भा. वारकरी महामंडळाच्या विभागीय विचार विनीमय सभा व नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पाळधी येथे अखील भारतीय वारकरी महामंडळाची विभागीय विचार विनीमय सभा व नियुक्तीपत्र प्रदान सोहळा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रारंभी उपस्थित किर्तनकार मंडळी ही टाळ मृदंगाच्या गजरात कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाली. यात खुद्द पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे देखील वारकरी म्हणून टाळाचा गजर करत सहभागी झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुशील महाराज यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी अखील भारतीय वारकरी महामंडळाची कार्यकारिणी जाहीर केली. विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज यांनी अतिशय छंदबध्द शब्दांमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याची महती वर्णन करत त्यांना वारकर्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी साकडे घातले. त्यांच्या काव्यमय प्रास्ताविकाला उपस्थितांची जोरदार दाद मिळाली.
याप्रसंगी पालकमंत्र्यांना वारकर्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने सध्या बहुतांश बाबी अनलॉक होत असतांना देवस्थाने बंद असून किर्तन-भजनादी धार्मिक कार्यक्रम देखील बंद असल्याने किर्तनकारांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिल्याचे सांगण्यात आले. ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत पाठपुरावा करून देवस्थाने उघडण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी यात करण्यात आली. यासोबत जिल्ह्याच्या ठिकाणी वारकरी भवन उभारण्यासह अन्य मागण्या या कार्तिकी वारीच्या आधी मान्य करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, अध्यक्षीय भाषणात ना. गुलाबराव पाटील यांनी आपण वारकरी असून याचा आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक परिणाम झाल्याचे सांगितले. गेल्या ३२ वर्षांपासून आपण वारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. ना. पाटील म्हणाले की, वारकरी हा मराठी संस्कृतीचा श्वास आहे. आपले संस्कार, परंपरा आणि मानवतेचा सर्वसमावेशक विचार टिकवून धरण्यासाठी किर्तनकारांनी केलेले प्रबोधन हे अतिशय उपयुक्त ठरले आहे. किर्तनकारांच्या माध्यमातून समाजातील तरूणाईला नवीन दिशा मिळत असते. आज लॉकडाऊनमध्ये सर्वच क्षेत्रातील लोक अडचणीत आले असून स्वाभाविकपणे किर्तनकारी मंडळीदेखील समस्यांनी ग्रासलेली आहे. तथापि, आजवर एकही वारकरी हा कधी मदतीसाठी कुणाकडे गेल्याचे दिसले नाही. मात्र आता आपल्या समस्या सोडविण्यासाठी वारकर्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यासाठी वारकर्यांनी संघटीत होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ना. पाटील यांनी केले.
दरम्यान, याच कार्यक्रमात वारकर्यांनी केलेल्या मागणीला मान्य करत जळगाव येथे अद्ययावत असे वारकरी भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा ना. गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमात केली. यात वारकर्यांना मुक्काम करण्यासाठीच्या सुविधांसह संगणकीय प्रणालीची व्यवस्था व अगदी सुसज्ज रूग्णवाहिका देखील येथे उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती ना. पाटील यांनी याप्रसंगी दिली. तर, जिल्हा तिथे वारकरी भवन या मागणीचा आपण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. दरम्यान, सद्यस्थितीत जिल्ह्यात फक्त १०० कलावंतांना शासकीय मानधन मिळत असून ही मर्यादा वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव , धुळे, नंदुरबार येथील ह. भ. प. गजानन महाराज वरसाडेकर, भाऊराव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नानासाहेब दहीवेळेकर, प्रकाश महाराज ज्ञानेश्वर महाराज गजानन महाराज वरसाडेकर नानासाहेब दहिवेलकर, मुकेश महाराज, सुशील महाराज, मुकेश महाराज,दत्ता महाराज,योगेश महाराज, सूर्यभान शेलगावकर, पं स सभापती मुकुंद ननावरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी , तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील , पवन सोनवणे , पंचायत समिती सदस्य जना पाटील, माजी सभापती अनिल पाटील, परिसरातील सर्व सरपंच , विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक यांच्यासह ग्रामस्थ व वारकरी संप्रदायाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प सी एस पाटील सर यांनी केले तर आभार ह भ प मुकेश महाराज यांनी मानले. सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.