जळगाव प्रतिनिधी । बॅँकेतून पेन्शनची रक्कम काढल्यानंतर मेडिकलवर औषध घ्यायला गेलेले ७० वर्षीय वयोवृध्दाच्या पिशवीतून ११ हजार रूपयांची रक्कम लांबविल्याची घटना १४ जुलै रोजी दाणाबाजारजवळील पोलन पेठ येथे घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेले जगन्नाथ बाबुराव भालेराव (७०, रा.आशाबाबा नगर, जळगाव) हे १४ जुलै रोजी नवी पेठेतील जिल्हा बॅँकेत पेन्शन घ्यायला आले होते. दीड वाजता बॅँकेतून १३ हजार रुपये काढले. दोन हजार बाजुला काढून ११ हजार रुपये सोबत आणलेल्या पिशवीत ठेवले.यानंतर ते दाणा बाजारात एका मेडिकल दुकानावर औषधी खरेदी केल्यानंतर पिशवीतील ११ हजार रुपये गायब झाल्याचे भालेराव यांच्या निदर्शनास आले. त्यांना नातेवाईकांशी संपर्क साधून घटनास्थळावर बोलावून घेतले. मेडिकलवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता भालेराव यांच्यामागे दोन महिला संशयास्पद फिरताना दिसून आल्या. त्यांच्याजवळ लहान मुलेही होती. याच महिलांनी ही रक्कम लांबविल्याचा संशय आहे. याप्रकरणी जगन्नाथ भालेराव यांनी पैसे लांबविल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.