जळगावात ‘मल्हार हेल्प-फेअर ३’चे उद्घाटन

malhar udghatan1

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील सर्व सेवाभावी संस्थांना एका समांतर प्लॅटफार्मवर आणण्यासाठी आणि त्यांचे सेवाकार्याची माहिती समाजासमोर आणण्यासाठी मल्हार हेल्प-फेअरची आज उत्साहात सुरूवात करण्यात आली.

यावेळी मंचावर खा. उन्मेष पाटील, आ. चिमणराव पाटील, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, समाज सेविका नयनतारा बाफना, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्सच्या संचालिका भारती चौधरी, सूरज पोळ, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, आनंद मल्हारा व इतर मान्यवरांचा समावेश होता.

‘मदतीचे हजारो हात’ हे ब्रीदवाक्य घेऊन समाजातील गरजू, वंचित, उपेक्षित घटकांसाठी कार्य करणाऱ्या, त्यांना तगण्यातून जगण्याकडे नेणाऱ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या सेवाभावी संस्थांसाठी आणि सेवाकार्य करणाऱ्या सेवामहर्षींसाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मल्हार हेल्प-फेअरचे आयोजन १५ ते १७ फेब्रुवारी २०२० दरम्यान सागर पार्क, जळगाव येथे करण्यात आले आहे. लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन व मल्हार कम्युनिकेशन्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या हेल्प-फेअर ३ मध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, दिव्यांग, मुक्या प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या आणि त्या प्रमाणेच अश्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ५० पेक्षा अधिक संस्थांचा हा मेळा असून याद्वारे तळागाळातील लोकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना यामध्ये आमंत्रित करण्यात आलेले आहे. या संथांना येथे विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यातआलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या भोजनाची व बाहेरगावहून आलेल्या संस्था चालकांच्या राहण्याची व्यवस्था देखील हेल्प-फेअर टीम कडून करण्यातआलेली आहे.

हेल्प फेअरच्या शुभारंभ प्रसंगी पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील म्हणाले की इतरांपेक्षा आमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत व आपणही समाजाचे देणे लागतो या नात्याने दातृत्व जपणाऱ्या संस्थांना पाठबळ द्यायला हवे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला प्रत्येक वर्षी मदत देण्याचे वचन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाला उपस्थित खा. उन्मेष पाटील यावेळी म्हणाले की जॉब फेअर, इंडस्ट्रियल फेअर आपण नेहमीच पाहत असतो पण सेवाव्रतींच्या कार्याला उजाळा देणारी ही अनोखी फेअर पाहण्याचा प्रथमच योग आला आहे. हे समाजाभिमुख कार्य असून खासदार या नात्याने आपण या उपक्रमाला नेहमी मदत करण्यास तत्पर राहू असे उद्गार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून इ-गव्हर्नन्स तज्ञ सूरज पोळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्सच्या संचालिका भारती चौधरी यांनी मानवतेची अनेक मंदिरे समक्ष पाहिल्याचे गौरवोद्गार यावेळी व्यक्त केले. देवाला तर आपण केवळ मूर्तिस्वरूपात पाहिले आहे पण मानवतेला सक्षम बनविणाऱ्या सेवाभावी संस्था म्हणजे साक्षात परमेश्वरच आहेत असे त्या म्हणाल्या.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत
हेल्प-फेअर ३ च्या प्रदर्शनीत विविध मनोरंजनाचे कार्यक्रमांचा देखील समावेश आहे. अनेक चिमुकल्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली व आकर्षणाचा केंद्र म्हणजे डान्स प्लस विजेता तनय मल्हाराने आपल्या सुरेख नृत्यकलेने सर्वांना मोहित केले. यावेळी दोन विदेशी योग कलाकारांनी देखील योगकलेचा उत्कृष्ट नमुना सादर केला.

संस्थां चालकांसाठी आज कार्यशाळा
हेल्प-फेअर ३ मध्ये सहभागी होणाऱ्या जळगाव जिल्हा आणि बाहेरून येणाऱ्या विविध संस्थांच्या संस्था चालकांसाठी हेल्प-फेअर टीमतर्फे आज सकाळी १० ते १ विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आज धर्मदाय नोंदणी कार्यालय अधीक्षक जळगाव श्री. विश्वनाथ नामदेव तायडे हे ”स्वयंसेवी संस्था- कायदेशीर पूर्तता” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर उद्या १७ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील श्री. शैलेश निपुनगे हे केंद्रीय बजेट व स्वयंसेवी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

Protected Content