पत्नीचे विवाहबाह्य संबंध तपासण्यासाठी डीएनए चाचणी अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य !

 

 

अलाहबाद : वृत्तसंस्था । येथील उच्च न्यायालयाने कौटुंबिक वादामध्ये महत्वपूर्ण निकाल दिला आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही हे तपासण्यासाठी डीएनए चाचणी करता येईल आणि त्याचा अहवाल हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल असं न्यायालयाने म्हटलं आहे.

हमीरपूर येथील एका जोडप्याचा कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोट झाला आहे. मात्र घटस्फोटानंतर तीन वर्षांनी या महिलेने आपल्या माहेरी असतानाच एका मुलाला जन्म दिला. महिलेने हे बाळ पतीचेच असल्याचा दावा केला आहे. मात्र पतीने घटस्फोटानंतर आपण पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवले नसल्याचं सांगत मुलं आपलं नसल्याचं म्हटलं आहे.

हा वाद पुढे उच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर न्यायालयाने या महिलेचा घटस्फोटित पतीच बाळाचे वडील आहेत की नाही ते तपासून पाहण्यासाठी डीएनए चाचणीचा मार्ग योग्य असल्याचे म्हटले. या चाचणीमुळे पत्नी व्यभिचारी आहे की नाही म्हणजेच तिचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही हे सुद्धा स्पष्ट होईल. असे न्यायालयाने स्पष्ट केले .

पती राम आरसे याने कौटुंबिक न्यायलयासमोर डीएनए चाचणी करण्यासंदर्भातील अर्ज केला होता. मात्र कौटुंबिक न्यायायलयाने हा अर्ज फेटाळून लावला. अखेर उच्च न्यायालयातील न्या. विवेक अग्रवाल यांच्या एक सदस्यीय खंडपिठाने डीएनए चाचणीसाठी होकार दिला आहे.

पतीने दिलेल्या माहितीनुसार १५ जानेवारी २०१३ पासून तो त्याच्या पत्नीसोबत राहत नाही. २५ जून २०१४ ला या दोघांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर आपला पत्नीशी कोणत्याही पद्धतीने संबंध राहिलेला नाही असा दावा पतीने केला आहे. घटस्फोटानंतर ही महिला तिच्या माहेरी राहत होती. घटस्फोटानंतर दीड वर्षांनी २६ जानेवारी २०१६ रोजी या महिलेने एका बाळाला जन्म दिला. मात्र १५ जानेवारी २०१३ नंतर पत्नीसोबत मी एकदाही शरीरसंबंध ठेवलेले नाही असं पतीने न्यायालयाला सांगितलं. तरीही पत्नीने हे मूल पतीचेचे असल्याचा दावा न्यायालयासमोर केला. मात्र पतीने हे मूल आपलं नसल्याचं सांगितलं. त्यानंतर वाद पुन्हा कौटुंबिक न्यायलयामध्ये गळा त्या न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर पतीने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

Protected Content