जळगाव – केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करीत ट्रुजेट विमान कंपनीने अहमदाबाद ते जळगाव व जळगाव ते अहमदाबाद अशी प्रवास सेवा आजपासून सुरू केली आहे.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा गेल्या अडीच महिन्यापासून केंद्र, राज्य शासनाने बंद केली होती. या पार्श्वभूमिवर, जळगाव विमानतळावरून जळगाव ते अहमदाबाद व परत अशी विमानसेवा ट्रुजेट कंपनीतर्फे आजपासून सुरू करण्यात आली. ६० सिटर विमानात अहमदाबादवरून जळगावला २० प्रवाशांनी तिकीट बुक केले होते. त्यातील १२ प्रवासी अहमदाबादला गेले.
अहमदाबादवरून जळगावला येण्यासाठी विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी करण्यात आली. केंद्र शासन, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय, राज्य शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांचे पालन करीत प्रवाशांचा प्रवास ट्रुजेट कंपनीने केला. अहमदाबादवरून जळगावला आलेल्या प्रवाशांचे स्वागत जळगाव विमान प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुनील मगरीवाल, महापालिकेचे उपायुक्त, नोडल अधिकारी मीनीनाथ दंडवते यांनी केले. आलेल्या व गेलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सामानाच्या बॅगेचे सॅनिटायझेशन, वैद्यकीय सक्षम असल्याचे अर्ज प्रवाशांकडून भरून घेण्यात आला. विमानात बसण्यापूर्वी व बाहेर पडल्यानंतर प्रवाशांचे सॅनिटायझेशन झाले. जे प्रवासी जळगावला आले त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला.