महिलेला शिवीगाळ करून विनयभंग तर पतीला जीवेठार मारण्याची धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेला शिवीगाळ करून विनयभंग केला तर तिच्या पतीला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात ३४ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार ९ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महिला घरात असतांना गावात राहणारे भगवान कोळी, प्रकाश कोळी, बापू बाविस्कर आणि पवन कोळी हे ४  जण दुचाकीने महिलेच्या घरी आले. त्यावेळी महिलेला “तुझा पती कुठे आहे, आम्ही त्याला सोडणार नाही” असे सांगून घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर महिलेला शिवीगाळ करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. आणि तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. या संदर्भात महिलेने सोमवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी भगवान कोळी, प्रकाश कोळी, बापू बाविस्कर आणि पवन कोळी या चौघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार माणिक सपकाळे करीत आहे.

Protected Content