जळगाव प्रतिनिधी । शहरातील बालाजी पेठेत जुन्या वादातून पित्यासह मुलीला चार जणांनी मारहाण करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली असून दोघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सतीश बद्रीनारायण शर्मा यांचे मोठे बंधू रवीकुमार बद्रीनारायण शर्मा हे कैलास मदनलाल तिवारी (रा.बालाजी पेठ) यांच्याकडे भाडेकरू आहेत. घर खाली करून घेण्यासाठी या दोघांमध्ये न्यायालयीन वाद आहेत. घर खाली करण्यासाठी घरमालक तिवारी हे शर्मा यांना त्रास देत आहेत. या पार्श्वभूमिवर काल रात्री साडेनऊच्या सुमारास कैलास तिवारी यांच्यासह सत्यनारायण तिवारी, रोहित तिवारी व राहुल तिवारी यांनी सतीश बद्रीनारायण शर्मा व त्यांची कन्या राधिका शर्मा वय (२२ रा.बालाजीपेठ) यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात सतीश शर्मा यांच्या चेहर्यावर व छातीवर वार केला तर राधिकाच्या डोळ्याजवळ वार केल्याचा आरोप सतीश शर्मा यांच्या मुलाने केला आहे. दरम्यान या घटनेत सतीश शर्मा आणि त्यांची मुलगी राधीका हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.