कार-दुचाकीच्या धडकेत वनरक्षक जागीच ठार; बामणोदजवळील घटना

यावल प्रतिनिधी । यावल पुर्व वनविभागात कार्यरत असलेले वनरक्षक दुचाकीने पाल येथून भुसावळकडे जात असतांना बामणोदजवळ समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना १४ जून रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी फैजपुर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल पुर्व वनविभागात वनरक्षक असलेले दत्तात्रय जाधव (वय-४५) हे रविवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीए ७१६) ने भुसावळ येथे आपल्या घरी जात असतांना यावल तालुक्यातील बामणोद गावाजवळ समोरू येणाऱ्या कार क्रमांक (एमएच १९ बीजे ५०१३) ने जोरदार धडक दिली. त्यात दत्तात्रय जाधव हे जागीच ठार झाले. हा तिहेरी मोटर सायकल व कार अपघात आहे. या अपघातामध्ये दुसऱ्या एका मोटर सायकलवर स्वार असलेल्या दोन व्यक्ती देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांचे नाव मात्र अद्याप कळू शकले नाही.

अपघात होताच मयत जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. यावेळी यावल ग्रामीण रूग्णालयात कोणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याची ओरड मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. फैजपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मयत वनरक्षक डी.डी. जाधव हे मूळचे जामनेर येथील रहिवासी आहेत ते भुसावळ येथे त्यांच्या पत्नी व एक मुलगा एक मुलगी यांच्यासह राहत होते. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील दीपक जाधव यांचे ते भाऊ तर जामनेर येथील अशोक पैहलवान उर्फ जाधव यांचे ते पुतणे होते. त्यांच्या अकस्मात अपघाती निधनामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये तसेच संपूर्ण यावल व पश्चिम वन कर्मचारी वर्गात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी १० वाजता यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विनेश पावरा यांनी शवविच्छेदन केले.

Protected Content