जळगावहून सावद्याला पळून आलेला कोरोना पॉझिटीव्ह अखेर पुन्हा रूग्णालयात !

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी । काही दिवसांपूर्वी कोरोना ‘पॉझिटीव्ह’ म्हणून आढळून आल्याने जळगावच्या कोविड रूग्णालयात उपचार घेणारा एक रूग्ण तेथून पळून दोन दिवस शहरात मुक्कामी असल्याने आज सकाळी त्याला पुन्हा हॉस्पीटलमध्ये घेऊन गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी शहरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह म्हणून आढळून आला होता. हा व्यक्ती मुंबईहून सावदा येथे आला होता. पॉझिटीव्ह निष्पन्न झाल्यानंतर त्याला जळगावच्या कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, उपचार सुरू असतांनाच तो रूग्णालयातून पळून साळीबाग जवळच्या गणपती मंदिराजवळच्या आपल्या भावाच्या घरी पळून आला होता. येथे त्याने दोन दिवस मुक्काम ठोकला होता. तर, दुसरीकडे पॉझिटीव्ह रूग्णाने पलायन केल्याने धास्तावलेल्या आरोग्य यंत्रणांनी त्याचा माग काढला. या अनुषंगाने आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास या व्यक्तीला रूग्णवाहिकेतून पुन्हा कोविड रूग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, शहरात दोन दिवस कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाने मुक्काम ठोकल्याचे उघडकीस आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ त्याच्या रहिवासाच्या ठिकाणी धाव घेतली. आज सकाळपासून या भागात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तर या रूग्णाच्या संपर्कात असलेल्या चौघांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. मुख्याधिकारी जोशी यांच्यासह पोलीस प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

Protected Content