एकाच दिवसात ५० डॉक्टर्सचा मृत्यू !

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा डॉक्टर्सला फटका बसला असून एकाच दिवसात याच्या संसर्गामुळे ५० डॉक्टर्सला प्राण गमवावे लागल्याची माहिती आयएमए संघटनेतर्फे देण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वसामान्यांसोबतच करोनाविरोधातील लढाई लढणाऱ्या डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २४४ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. रविवारी ५० डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक मृत्यू बिहार (६९), उत्तर प्रदेश (३४) आणि दिल्लीत (२७) झाले आहेत. यापैकी फक्त तीन टक्के डॉक्टरांचं लसीकरण झालं होतं.

देशात लसीकरण मोहीम सुरु होऊन पाच महिने झाले आहेत. मात्र अद्यापही ६६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. डॉक्टरांनी लस घ्यावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर जयेश लेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी ५० डॉक्टरांचा मृत्यू आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २४४ डॉक्टरांनी जीव गमावणं आमच्यासाठी खूप दुर्दैवी आहे”. कोरोनामुळे एक हजार डॉक्टरांचा मृत्यू झाले असल्याचं सांगत असताना ही संख्या अजून जास्त असण्याची शक्यता आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन फक्त त्यांच्या साडे तीन लाख सदस्यांचा रेकॉर्ड ठेवतं. पण भारतात १२ लाखांहून अधिक डॉक्टर आहेत.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल (वय 62) यांचे सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरोना संसर्गामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते.

Protected Content