जळगावच्या सुप्रिम कॉलनीनजीक बेकायदेशीर गुरांचा कत्तलखाना…!

जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीजवळील हॉटेल निलांबरीच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गुरांचा बेकायदेशीर कत्तलखाना सुरू असल्याची तक्रार बजरंग दलाने एमआयडीसी पोलिसात देवूनही पोलिसांनी डोळेझाक केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आज मनपाचे आरोग्य अधिकारी यांनी भेट दिल्यानंतर अखेर कत्तलखान्याची पाहणी करून चौकशी केली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव-औरंगाबाद रोडनजीक असलेल्या सुप्रिम कॉलनी परिसरात बेकायदेशीर कत्तलखाना गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात सुरू आहे. हॉटेल निलांबरीच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत होती. काही सुज्ञ नागरिकांनी ही बाब बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या नजरेस दोन दिवसांपुर्वी आणून दिली. त्यानुसार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात धाव घेतली व रितसर तक्रार दिली. मात्र पोलीसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा काहीचा आरोप आहे. सदर प्रकरणात पोलिस आणि बेकायदेशीर कत्तलखाना चालक यांच्या ‘अर्थ’पुर्ण व्यवहार तर होत नाही ना ? अशी शंका परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी ‘लाईव्ह ट्रेन्डस न्यूज’शी बोलतांना दिली. दरम्यान आज महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कत्तलखान्याची पाहणी केली. याबाबत आम्ही पुर्ण चौकशी करू असे मोघम उत्तर दिले आहे. जेसीबीच्या माध्यमातून पालिका कत्तलखाना उद्ध्वस्त करणार असल्याचे मनपा सुत्रांनी सांगितले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलिसांनी पाहणी केली आहे. मात्र पुढील कारवाई कधी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसात कत्तलखाना चालकाविरूध्द उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Protected Content