जयंत पाटलांचा काँग्रेसला इशारा

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. शेवटपर्यंत काँग्रेसनं स्वबळाचा आग्रह धरला, तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवेल”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

 

काही दिवसांपासून राज्यात काँग्रेसनं दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि २०२४च्या विधानसभा निवडणुका देखील काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर महाविकासआघाडी सरकारचं काय होणार? याची चर्चा सुरू झाली.

 

यावेळी जयंत पाटील यांनी तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याबाबत आशावाद व्यक्त केला आहे. नाना पटोलेंच्या एकला चलो रे नाऱ्यावर बोलताना ते म्हणाले, “आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. त्यांचे अध्यक्ष स्वबळाबद्दल बोलत असले, तरी जेव्हा परिस्थिती येईल, तेव्हा आम्ही सगळे एकत्र लढू असं मला वाटतंय. जर काँग्रेसने शेवटपर्यंत स्वबळाचाच आग्रह धरला, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जातील”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

 

पुण्यामध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या स्वबळाच्या घोषणेविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. “आधीचं सरकार ५ वर्ष चाललं, पण त्यावेळी देखील ते प्रत्येक ठिकाणी स्वबळावर चालले. तरी ते सरकार चाललंच. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हे सरकार निर्माण करताना एकच भूमिका मांडली होती की, भाजपला थांबविण्यासाठी या सरकारमध्ये सामील झालो आहोत. त्यामुळे आम्ही पर्मनंट आहोत असा उल्लेख त्यावेळी कुठेही केला नव्हता”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे स्वबळाच्या मुद्द्यावरून महाविकासआघाडीमध्ये चांगलची खळबळ उडाली आहे.

 

स्वबळाच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील काँग्रेसला सुनावलं आहे. “महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्या पक्षात देखील एक नेता म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरा नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही. त्यामुळे आधी त्या सगळ्यांनी गोंधळातून बाहेर यावं. आणि नंतर स्वबळ वगैरे काय आहे त्यावर निर्णय घ्यावा”, असं राऊत म्हणाले आहेत.

 

Protected Content