पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला संबोधित करणार !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना व्हायरसला थोपविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा उद्या (मंगळवार) शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याच्या बाजूने मत मांडले होते. या बैठकीनंतर सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राज्यातील लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिलनंतरही वाढवण्यात येत असून लॉकडाउन किमान ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केली होती. महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, ओदिशा, पश्चिम बंगालनेही ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर पंजाबने १ मे पर्यंत लॉकडाउन सुरु राहणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारही सध्या सुरू असलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवण्याची शक्यता आहे. पण राज्यांचे लॉकडाऊन असतानाही केंद्राच्या लॉकडाऊनची काय गरज? असाही प्रश्न निर्माण होतो.

Protected Content