पुन्हा युतीसाठी चंद्रकांत पाटलांचे अप्रत्यक्ष संकेत

 

 मुंबई : वृत्तसंस्था । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना युतीसाठी खुणावलं आहे. त्यांनी सकारात्मक विचार केल्यास आमचे नेतेही विचार करतील असं त्यांनी सांगितलं.

 

शिवसेनेनं सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेलेत. मात्र शिवसेना आमदार आणि नेते प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना युतीसाठी पत्र लिहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लेटर बॉम्बनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया येत आहेत

 

“प्रताप सरनाईक हे त्यांचे नेते आहेत. आमदार आहेत. उद्धवजींनी त्यांच्या विनंतीचा विचार केला, तर आमचे नेतेही वर बसलेले आहेत. तेही विचार करतील. आता प्रताप सरनाईक यांना वाटतंय. तेच आम्ही १८ महिन्यांपूर्वी घसा फोडून सांगत होतो. त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेबांनी आयुष्य घालवलं. त्यांच्याबरोबर सत्तेत का बसता? हेच आम्ही सांगत होतो.”, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

 

Protected Content