नाराजी असली तरी जिल्ह्यातील शिवसैनिक युती धर्माचे पालन करतील : संपर्कप्रमुख संजय सावंत यांची ग्वाही

 

 

hqdefault

 

जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल शिवसैनिकांच्या तक्रारी किंवा नाराजी असली तरी ते आगामी निवडणुकीत वरीष्ठांच्या आदेशानुसार युती धर्माचे पालन करतील, असा स्पष्ट निर्वाळा शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी आज येथे जळगाव लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिला.

श्री.सावंत पुढे म्हणाले की, भाजपबद्दल संपूर्ण राज्यातूनच कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत पण त्यांचा हेतू विरोधात जाने नसून आपल्या व्यथा वरीष्ठांपुढे मांडणे हा आहे. त्यांनी भावना काहीही व्यक्त केल्या तरी ते पक्षाच्या आदेशाप्रमाणेच कार्य करतील. युतीचा निर्णय व्यापक दृष्टीकोन लक्षात घेऊन राष्ट्रीय पातळीवरून होत असतो. मात्र स्थानिक पातळीवर पक्षांमध्ये नाराजी तशीच असते. ती अशा मेळाव्यातून बाहेर येत असते. कार्यकर्त्यांच्या व्यथा आम्ही वरिष्ठांपर्यंत मांडू, काही समस्या इथल्या इथे सोडवता आल्या तर मार्ग काढू. जोपर्यंत स्थानिक पातळीवर पक्ष व नेते भक्कम होत नाहीत, तोपर्यंत प्रतिस्पर्धी विचारधारेचे लोक प्रबळ होऊ नये म्हणून युती करणे गरजेचे असते. त्यामुळे अशाप्रकारे नाराजीही स्वाभाविक असते. ती नाराजी दूर करण्याचा, स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्याचा आम्ही संपर्कप्रमुख, स्थानिक पदाधिकारी, आमदार व मंत्रीमंडळ सहकारी सातत्याने प्रयत्न करीत असतो. रावेर लोकसभा मतदार संघातही लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला जाईल, आणि तिथे नाराजी असेल तर ती दूर केली जाईल. तेथील शिवसैनिकही निवडणुकीत युती धर्माचे पालन करतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Add Comment

Protected Content