जन आशीर्वाद यात्रेची पोलखोल राष्ट्रवादी करणार

 

मुंबई : वृत्तसंस्था । आता आपण जन आशीर्वाद यात्रेची पोलखोल करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

 

सध्या भारतीय जनता पार्टीकडून जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेदरम्यान भाजपा नेते जनतेमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती पोहचवत आहेत. या यात्रेवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

 

केंद्रातील भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असतानाही जन आशीर्वाद यात्रा काढत आहे. या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजपाची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आजपासून राज्यातील विविध जिल्हयात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

 

वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल गॅसची दरवाढ, कोरोना काळात आलेले अपयश, पेगॅससच्या माध्यमातून केलेली हेरगिरी या सर्व गोष्टींचा उहापोह या पत्रकार परिषदेत केला जाणार आहे. शिवाय ओबीसी व मराठा आरक्षणात केंद्रसरकार कशी चालढकल करुन राज्यात तेढ निर्माण करत आहे हेही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

 

या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी या यात्रेविरोधात ३६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. भाजपा नेत्यांनी या यात्रेदरम्यान गर्दी करत शक्तिप्रदर्शन केले तसंच कोरोना प्रतिबंधाचे नियम म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर न करणे अशा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाल्याची नोंद झाली आहे.

 

Protected Content