#जनता कर्फ्यू : देशभरात सार्वजनीक स्थळांवर शुकशुकाट

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद लाभल्याचे दिसून येत असून बहुतांश शहरे आणि गावांमधील सार्वजनीक ठिकाणांवर शुकशुकाट आढळून येत आहे.

कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आज देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. या अनुषंगाने देशातील नागरिकांनी यात सहभागी होण्याची आवाहन पंतप्रधानांसह विविध मान्यवरांनी केले आहे. याला देशवासियांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. बहुतांश शहरे आणि गावांमध्ये आज सकाळी सात वाजेपासूनच शुकशुकाट आढळून येत आहे. बहुतांश दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने ही सकाळपासूनच बंद आहेत. दरम्यान, किराणा दुकाने, हॉस्पीटल्स, औषधी दुकाने, पॅथॉलॉजी लॅब्ज आदींना जनता कर्फ्यूमधून सुट देण्यात आलेली आहे. हा अपवाद वगळता सर्व दुकाने बंद आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने आज बहुतांश प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या असून लोकल देखील मर्यादीत प्रमाणात सुरू आहेत. बसेससह अन्य प्रवासी सुविधादेखील आज सकाळपासूनच बंद आहेत. अनेक शहरांमध्ये जनता कर्फ्यूच्या दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन हे सज्ज असल्याचेही दिसून येत आहे. जनता कर्फ्यू हा अनिवार्य नव्हे तर स्वैच्छीक या प्रकारातील असून नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे.

Protected Content