जगातील सर्वाधिक प्रभावी १०० व्यक्तींच्या यादीत मोदी

 

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेतील सुप्रसिद्ध नियतकालिक ‘टाइम’ने जगातील सर्वाधिक प्रभावी १०० व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणालाही यादीत स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समावेशाबाबत लिहीताना ‘टाइम’ने टीकात्म सूर लावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत टाइमने म्हटले की, लोकशाहीमध्ये फक्त निवडणुकीत विजयी होणे एवढेच महत्वाचे नसते. निवडणुकीत फक्त कोणाला अधिक मतदान झाले आहे. याबाबतची माहिती समजते. निवडणुकीपेक्षाही काही बाबी महत्वाच्या आहेत. ज्या समुदायाने समाजघटकाने तुम्हाला मतदान केले नाही, त्यांच्या अधिकारांबाबत तुम्ही काय भूमिका घेता हे महत्त्वाचे असल्याचे टाइमने म्हटले आहे.

सात दशकांपासून भारत हा सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या १३० कोटी लोकसंख्येत हिंदूसह, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन आणि इतर धर्मियांचाही समावेश आहे. टाइमचे संपादक कार्ल विक यांनी म्हटले की, भारतात अनेक वर्षांपासून शरणार्थी म्हणून वास्तव्यास असणाऱ्या दलाई लामा यांनी सद्भाव, एकोपा आणि स्थिरता याचे उदाहरण म्हणून भारताचे उदाहरण दिले होते. भारताबाबत असे मत असणाऱ्यांच्या मनात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संशय निर्माण केला आहे. भारताचे बहुतांशी पंतप्रधान हे ८० टक्के लोकसंख्या असलेल्या हिंदू समुदायातून आलेले होते. मात्र, त्यापैकी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात इतर धर्मियांना कोणतेच स्थान नाही, असे वातावरण निर्माण केले असल्याचे कार्ल यांनी सांगितले.

कार्ल विक यांनी म्हटले की, ‘नरेंद्र मोदी लोकप्रिय घोषणा, आश्वासने देऊन सत्तेवर आले. मात्र, त्यांच्या हिंदुत्ववादी भाजप पक्षाने बहुसंख्यवादाच्या नावावर मुस्लिम समुदायाला लक्ष्य केले भाजपसाठी हा द्वेषावर आधारीत असलेला बहुसंख्यवाद कोरोना महासाथीच्या आजारामुळे निर्माण झालेला असंतोष दडपून टाकण्याचा मार्ग झाला. जगातील सर्वात मोठी लोकशाही अंधकाराकडे जात असल्याचे टाइमने म्हटले आहे. याआधीदेखील टाइममध्ये पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करणारे आणि टीका करणारे लेख प्रकाशित केले होते. त्यावेळीही त्याची चर्चा झाली होती.

टाइमच्या १०० प्रभावी व्यक्तींच्या यादीत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, एचआयव्ही संशोधक रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग आंदोलनात सहभागी असलेली बिल्किसचाही समावेश करण्यात आला आहे. यादीमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, तैवानचे राष्ट्रपती त्सेइंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या सिनेटर कमला हॅरिस, जो बायडन, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल आदींचा समावेश आहे.

Protected Content