आयबीपीएस’च्या स्पर्धा परीक्षांना उमेदवार मुकले

 

पुणे : वृत्तसंस्था । राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा लांबल्याचा फटका ‘आयबीपीएस’च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना बसला असून, अर्ज करण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाची अंतिम वर्षाची म्हणजे पदवीची गुणपत्रिका अनिवार्य करण्यात आली आहे. आयबीपीएसद्वारे गुणपत्रिका जमा करण्यासाठी आज २३ सप्टेंबर ही अंतिम मुदत दिल्याने राज्यातील अनेक स्थानिक विद्यार्थ्यांना अर्जच करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशातील १७ राष्ट्रीयकृत बँकांमधील दोन हजार ५५७ क्लार्क भरतीसाठी आयबीपीएस या केंद्रीय संस्थेमार्फत डिसेंबर महिन्यात पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची जानेवारी २०२१ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, या परीक्षेला अर्ज करण्यासाठी; कागदपत्रांची पूर्तता व पडताळणी करण्याची अंतिम मुदत २३ सप्टेंबर दिली आहे. अर्ज करतांना पात्र करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पदवीच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका २३ सप्टेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्यात पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अजून परीक्षाच झाल्या नाही. त्यामुळे निकाल जाहीर होण्याचा प्रश्नच नाही. साधारण ८ लाख विद्यार्थी अंतिम वर्षाला आहे. या सर्व परिस्थितीचा फटका परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना बसला आहे.

या परीक्षेची तयारी विद्यार्थी दोन ते तीन वर्षे करतात. त्यामुळे या संधीपासून त्यांना वंचित राहावे लागणे हे दुर्दैवी आहे, असे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले आहे.

अंतिम वर्षातील अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही, ही परीक्षा देता येणार नाही. आता राज्य सरकारने तातडीने पावले उचलून आयबीपीएसकडे पाठपुरावा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Protected Content