दार उघड भावा…दार उघड ! : भातखळकरांची खोचक टीका

मुंबई प्रतिनिधी । मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घरातच बसले असल्याचा आरोप करून दार उघड भावा…दार उघड अशा शब्दात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबईच्या पूरसदृश्य परिस्थितीवरुन विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उध्वस्त झाले. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली. संततधार पावसात मुंबईकरांची परवड. महापालिका मख्ख, राज्य सरकार ढिम्म, मुंबईकर बेहाल त्यासाठी दार उघड भावा दार उघड अशा शब्दात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट करून टीकास्त्र सोडले आहे.

याबाबत अतुल भातखळकर म्हणाले की, मुंबई महापालिकेने रात्रीच्या पावसात पुन्हा एकदा शहर तुंबवून दाखवलं, नालेसफाई टक्केवारी, कोविड सेंटरमधील टक्केवारी, महापौरांवर आरोप, या भ्रष्टाचाराने लडबडलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारामुळे सर्वसामान्य मुंबईकरांवर ही परिस्थिती उद्भवली आहे. उपनगरातील पालकमंत्री आदित्य ठाकरे उपनगराकडे फिरकायला तयार नाही, ते केवळ पर्यटनात आणि ताज महाल हॉटेलच्या करारात रमले आहेत, आता तरी पालकमंत्र्यानी दौरा करावा आणि झोपडपट्टीतील लोकांसाठी प्रत्येक १० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Protected Content