मुक्ताईनगर, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व चोपडा या तालुक्यामध्ये २७ व २९ मे रोजी झालेल्या जोरदार पाउस व वादळामुळे शेती तसेच राहत्या घरांना मोठा फटका बसला होता. या नागरिकांना राज्य सरकारने तात्काळ मदत द्या अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री व विरोधी पक्षनेते यांना पत्राद्वारे केली आहे.
दिनांक २८, २९ व ३० मे रोजी रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल, चोपडा तालुक्यातील सदर नुकसानग्रस्त गावांच्या शेती शिवार व राहत्या घरांचा स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी तसेच विमा कंपनी अधिकारी व प्रतिनिधीसह खासदार रक्षाताई खडसे यांनी दौरा करून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली होती. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात नुकसानग्रस्त शेती शिवार व घरांची पाहणी केली होती. यामध्ये मुख्यत: उभी केळी व पपईची पिके जमीनदोस्त झालेली असून नागरिकांची कच्ची घरे सुद्धा संपूर्ण जमीनदोस्त होऊन राहत्या घरांमधील दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच साठवलेल्या धान्याचे सुद्धा खूप नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. यामुळे शेतकरी व नागरिकांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले गेलेले असून त्यामुळे त्यांना पुढील २ ते ३ वर्ष खूप मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार होता. आधीच कोरोना महामारीचा सामना करीत शेतकऱ्यांनी बँकेतुन कर्ज काढून मोठ्या कष्टाने पिके उभी केली होती. सदर शेती व घरांच्या नुकसानीचे शासन स्तरावरून व विमा कंपनीद्वारे वस्तूत: पंचनामे झालेले असून, एक महिना उलटून सुद्धा आजपावतो नुकसानग्रस्त शेतकरी तर सोडाच आपले रहाते घर गमावलेल्या गरिकांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना १५ दिवसात मदत देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. परंतु याबाबत शासनाकडून कोणत्याच प्रकारच्या हालचाली दिसून येत नाही आहे.त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता त्यांना मोठा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या स्तरावरून तत्काळ प्रयत्न करावे असे खासदार रक्षाताई खडसे यांनी निवेदनात नमूद केले आहे.