चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी नाही

 

मुंबई: वृत्तसंस्था । अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करता येणार नाही. गुन्हा व्यक्तिगत असून त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही. अर्णब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणणे अयोग्य ठरेल’, अशी भूमिका अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर पत्रकार संघटनांनी घेतली आहे.
..

मे २०१८ मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तुविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार अलिबाग गुन्हे अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली. या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झूल पांघरून वाट्टेल तसे उद्योग करणाऱ्यांची पाठराखण आम्ही करू शकत नाही. कायद्याला त्याचे काम करू द्यावे हेच उचित ठरेल, असे मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने स्पष्ट केले आहे.

अर्णब गोस्वामी यांनी पत्रकारितेचे सर्व संकेत पायदळी तुडवले असून पत्रकारिता कशी नसावी याचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे. त्यांची पत्रकारिता समर्थनीय नाही असे आम्हाला वाटते, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर ‘ टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन ‘नेही आपली भूमिका स्पष्ट केली. अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक एका व्यक्तिगत गुन्ह्यातून आहे. पत्रकारितेशी त्याचा संबध नाही. कायद्यासमोर सगळे समान असतात. त्यामुळे कायद्याला आपले काम करू द्या, न्याय व्यवस्थेतून सत्य जनतेसमोर येईलच. आम्ही पत्रकार म्हणून सत्यासोबत आहोत, असे असोसिएशनने म्हटले आहे.

या प्रकरणासंदर्भात बोलणारे भाजप नेते भाजप शासित राज्यांमध्ये अनेक पत्रकारांना अटक झाली तेव्हा कुठे होते, असा प्रश्न ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी उपस्थित केला आहे.

Protected Content