चोरीच्या दुचाकीवरूनच मोबाईल लांबविणाऱ्या बच्चे गँगचा पर्दाफाश

 

जळगाव प्रतिनिधी । मोबाईल लांबविण्यासाठी दुचाकी चोरली आणि तिच्याच माध्यमातून मोबाईल धुमस्टाईल लांबविणार्‍या बच्चे गँगचा शनिपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तिघेही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी एकाच दिवशी विविध तीन ठिकाणांहून धुमस्टाईल लांबविलेले मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केले आहे. दरम्यान संबंधित तिघेही अल्पवयीन ही शनिपेठ हद्दीतील असून अल्पवयीन असल्याचा फायदा घेत चोर्‍या, हाणामारी करत असल्याने शनिपेठ पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

चाकूने वार करत लांबविली होती दुचाकी 
शहरातील कोळीपेठेतील मन्यार वाड्यातील रहिवासी रफीक शेख मजीद मन्यार (३१) यांचे रथ चौकात इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास रफीक शेख हे त्यांच्या एमएच १९ सीटी १८३४ ने सुभाष चौकातून रथ चौकाकडे जात असतांना तिघांनी रफीक शेखला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाण करणार्यांपैकी एकाने रफीक शेख यांना चाकूने पोटावर वार करीत दुसर्याने त्यांच्याकडील दुचाकी जबरदस्तीने हिसवित त्याठिकाणाहून पळ काढला. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. याठिकाणाहून लांबविले मोबाईल दुचाकी हातात लागल्यावर तिघांनी शहरात विविध ठिकाणी मोबाईल धुमस्टाईल लांबविले. यात दुचाकी चोरली यानंतर शहरातील बेंडाळे चौकात नागोरी चहाजवळून रिक्षा बसून मोहसीन खालीद बागवान (वय-१७) रा. जोशी पेठ पतंग गल्ली हे जात असतांना, त्यांच्या हातातून मोबाईल लांबविला होता. यानंतर रविंद्र सिताराम तायडे (वय-५०) रा. हरेश्वर नगर हे सोमवारी २१ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता रिंगरोडवरील संवेदनशिल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल समोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्यांच्या हातातील १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. यानंतर आकाशवाणी चौकातून मोबाईल लांबविला होता.

शनिपेठ पोलिसांनी मध्यरात्री घेतले ताब्यात सलग चोरीच्या घटनांबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी मार्गदर्शन तसेच सुचना केल्या होत्या. शनिपेठ हद्दीत माया गँगच्या नावाने असलेल्या अल्पवयीन चोरट्यांनी मोबाईल लांबविले असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक खेमराज परेदशी, सहाय्यक फौजदार सलीम पिंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र पाटील, पोलीस नाईक अमोल विसपुते, मुकूंद गंगावणे, अनिल कांबळे, राहूल पाटील, राहूल घेटे, यांच्या पथकाने प्रारंभी अल्पवयीन चोरट्याचा साथीदारास चौकशीकामी ताब्यात घेतले. त्याच्याच माध्यमातून आकाशवाणी चौकात व्हाईटरचा नशा करणार्‍या माया गँगच्या दोघा अल्पवयीन चोरट्यांना सापळा रचून पथक ाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी तसेच तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

Protected Content