चाळीसगाव: प्रतिनिधी । चैतन्य तांडा येथे मनरेगा योजनेअंतर्गत विविध कामे केली जात आहेत . योजनेत चैतन्य तांड्याची निवड करण्यात आलेली आहे. या गावाला आदर्श म्हणून जिल्हा पातळीवर नेण्याचा गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी संकल्प केलाय
चैतन्य तांडाची लोकसंख्या ११०० असून गावात २५० कुटुंब वास्तव्यास आहे. ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी अनिता राठोड व उपसरपंच आनंदा राठोड आहेत. सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नातून काही दिवसांपासून गावात विकासकामे केली जात आहेत .
१४ वा वित्त आयोगाच्या निधीतून गावात ५ लाखाचे कॉंक्रीटीकरण, आमदार निलय नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून ३ लाखांचा प्युअर ब्लॉग (संगम हॉटेल समोर), खा. उन्मेश पाटील यांच्या विकास निधीतून ३ लाखांचा प्युअर ब्लॉग, लोकवर्गणीतून गावात २०० कुटुंबाचे शौच खड्डे तयार करण्यात आले आहेत . उर्वरीत ५० शौच खड्डे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी मनरेगा योजनेअंतर्गत बांधून दिले
गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी मनरेगा योजनेअंतर्गत चैतन्य तांड्याला आदर्श गावाचा दर्जा मिळविण्याचा निर्धार केला आहे. सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्वच्छ गाव, हागणदारीमुक्त गाव लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मनरेगा योजनेअंतर्गत लक्षाधीश कुटुंब व समुद्ध ग्राम हे दोन अभियान राबविण्यात येणार आहे. लक्षाधीश कुटुंब अंतर्गत गावातील २२२ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांवर वाढविण्यावर भर असणार आहे. बचत गटाना प्रथम प्राधान्य हे चैतन्य तांड्याला मिळणार आहे. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे. बंजारा समाजातील हस्तकला जसे लावन भरणे, संसारोपयोगी वस्तू बनविणे आदी गोष्टींना चालना देण्यात येणार आहे.