चीनची नेपाळमध्ये घुसखोरी

काठमांडू: वृत्तसंस्था । नेपाळ-चीन सीमेलगतच्या हुमला भागात चीनकडून बांधण्यात येणाऱ्या ९ इमारतींच्या बांधकामाला नेपाळी जनतेकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. चीनकडून नेपाळचा भूभाग हडपण्याचा हा डाव असल्याचा आरोप करत चिनी दूतावासाबाहेर आंदोलन करण्यात आले.

चिनी दूतावासावर आंदोलनासाठी मोठ्या संख्येने नागरीक जमा झालेत. चायना गो बॅक सारख्या घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला. मागील काही वर्षांपासून चीन आणि नेपाळमध्ये जवळीक वाढत आहे. मित्र असल्याचे सांगणाऱ्या चीनने आता नेपाळच्या भूभागावर ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. नेपाळच्या हुमला भागात चीनने ९ इमारती उभारल्या आहेत. या घुसखोरीची माहिती समोर आल्यानंतर ओली सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.

हुमलाचे सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकारी दलबहादूर हमाल यांनी ३० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत हुमला येथील लापचा-लिमी परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांना नेपाळच्या भूमीवर चीनने बनवलेल्या ९ इमारती पाहिल्या. नेपाळी माध्यमांनी यापूर्वी दिलेल्या वृत्तात फक्त एका इमारतीचा उल्लेख आहे. परंतु पाहणीनंतर तेथे आणखी आठ इमारती आढळून आल्या आहेत.

हा भाग लापचा-लिपू भागाच्या मुख्यालयापासून दूर असल्यामुळे दुर्लक्षित राहिला आहे. नेपाळने या भागात कोणत्याही प्रकारची पायाभूत सुविधाही उभारली नाही. नेपाळचे अधिकारीदेखील या भागाचा दौरा करत नाही. त्याचाच फायदा घेत चीनने या भागात बांधकाम केले.

चिनी घुसखोरीची माहिती समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आपला अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला आहे. यामध्ये चिनी घुसखोरीची माहिती देण्यात आली आहे. दबाव वाढल्यानंतर हा अहवाल परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आला आहे.

Protected Content