नाईट कर्फ्यू , लॉकडाउन परिणामकारक नाही ; केंद्राचे राज्याला पत्र

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्राने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवलं असून, नाईट कर्फ्यू आणि नव्याने लागू केलेला लॉकडाउन परिणामकारक नसल्याचं म्हटलं आहे.

 

राज्यात  फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णवाढीचा वाढता आलेख कायम असून, दिवसेंदिवस तो आणखी वर सरकू लागला आहे. अनेक शहरांमध्ये संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं असून, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू आणि अंशतः लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर केंद्राने संबधित राज्यांमध्ये तज्ज्ञांची पथकं पाठवली होती. या पथकांनी राज्यातील  प्रसार नियंत्रित करण्याबरोबर उपाययोजनासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. अहवालानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं असून, नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउनसारख्या उपाययोजना प्रसार रोखण्यात फारशा परिणामकारक नसल्याचं म्हटलं आहे.

 

केंद्रीय पथकांनी विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर केंद्राने विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत.  प्रसार रोखण्यासाठी संक्रमित घरं शोधणे व कंटेमेंट झोनवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. संक्रमण रोखण्यासाठी एखादी व्यक्ती बाधित आढळून आल्यास तिच्या संपर्कातील २० ते ३० जणांचा शोध घेण्याची गरज आहे, असं केंद्राने म्हटलं आहे. बस स्थानकं, झोपडपट्टी भाग, रेल्वे स्टेशन यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी राज्य सरकारने रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्सचा वापर करायला हवा. जे लोक  पॉझिटिव्ह आढळून येत आहेत आणि घरातच विलगीकरणात आहेत, त्याचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, असं केंद्राने  म्हटलं आहे.

Protected Content