चिंताजनक : पुण्यात एका रात्री ५३ रुग्ण वाढले

पुणे (वृत्तसंस्था) पुणे जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून तर आज सकाळी नऊ वाजेपर्यंत ५३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आता पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९३४ वर पोहचली आहे.

 

पुणे जिल्ह्यात बुधवार मध्यरात्रीपर्यंत ३२ रुग्ण तर आज सकाळी नऊ वाजेपर्यंत २१ रुग्ण वाढले आहेत. तर एकूण मृतांचा आकडा ५९ वर गेला आहे. पुणे शहरात २२ एप्रिलपर्यंत ७८३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. भवानी पेठेत सर्वाधिक म्हणजे १७१ रुग्ण आहेत, तर कोथरुड बावधन परिसरात सर्वात कमी म्हणजे एक रुग्ण आहे. कसबा विश्रामबाग वाड्यापाठोपाठ ढोले पाटील रोड भागातील रुग्णसंख्याही शंभराच्या वर गेली आहे. येरवडा-धानोरी आणि शिवाजीनगर-घोले रोड भागात 75 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. दुसरीकडे शिवाजीनगर-घोलेरोड (१८ नवे रुग्ण), येरवडा-धानोरी (१४), ढोले पाटील रोड (१३), कसबा-विश्रामबाग वाडा (९) या भागात एका दिवसात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गुरुवारी देशात कोरोना विषाणूची एकूण संख्या २१ हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या महामारीमुळे आतापर्यंत ६८१ लोकांचा बळी गेला आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या आता २१३९३ वर पोहोचली आहे.

Protected Content