मुंबई (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३५ हजारांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार १ मे रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३५ हजार ४३ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशभरात १ हजार १४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे ५८३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०, ४९८ इतका झाला आहे. तर कोरोना रुग्णांच्या संख्येत गुजरात हे दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या ४,३९५ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ६१३ जण बरे झाले आहेत. तर २१४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. याशिवाय, दिल्लीत आतापर्यंत कोरोनाचे ३,५१५ रुग्ण आढळून आले होते. यापैकी १०९४ लोक उपचारानंतर बरे झाले. तर ५९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनाचा प्रसार २०० पेक्षा अधिक देशांमध्ये झाला आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ लाख ३९ हजार २२० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २ लाख २८ हजार ८६० जणांचा मृत्यू झाला आहे.