मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई वृत्तसंस्था । कारोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतांना बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. महाव्यवस्थापकांच्या आवाहनानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या आहेत मागण्या
बेस्ट कर्मचारी करोनाबाधित झाल्यावर त्याचं आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांचं विलगीकरण करण्यात यावं, प्रत्येक आगारात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून प्रत्येक बेस्ट कामगारांची करोना चाचणी रोज करण्यात यावी, बेस्ट कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी राखीव व स्वतंत्र बसगाड्या सुरू कराव्यात, करोनाबाधित मात्र कोरोनाचे लक्षण नसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात यावे आणि तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, करोनाच्या विरोधात लढण्यासाठी कर्तव्यावर उपस्थित असलेले आणि करोनाबाधित होऊन मृत्यूमुखी पडलेले बेस्ट, पालिका व अन्य आस्थापनातील, पोलीस कर्मचारी यांना शहीद दर्जा देऊन इतर सर्व सवलती त्यांना देण्यात याव्यात, अशा अनेक मागण्या बेस्ट उपक्रमाकडे करण्यात आल्या होत्या.

करोनाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी अत्यावश्यक सेवांच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवत कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर ६० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले होते. त्यानंतर संपूर्ण कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘बेस्ट’ उपक्रमातील जवळपास शंभरहून अधिक कर्मचारी आतापर्यंत करोनाबाधित झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची आसपासच्या शहरांतून आणि मुंबईतून ने-आण करत असताना या कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.

Protected Content