चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव नदीपात्राची स्वच्छता करा – जन आंदोलनाचे मुख्यमंत्र्यांना साकडे माझी वसुंधरा अभियान राबवितांना जल प्रदूषण टाळण्यासाठी चाळीसगाव येथील नदीपात्राची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी जन आंदोलन खान्देश विभागाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे करण्यात आली आहे.
ई-मेलचा आशय असा की, माझी वसुंधरा अभियानतंर्गत चाळीसगाव नगरपालिकेने नदीपात्रातील कचर्याची विल्हेवाट लावावी. चाळीसगाव नगरपरिषदेचे वतीने माझी वसुंधरा अभियान राबविण्या येत आहे. नगरपालिका क्षेत्रात पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात झाली असून शासनाच्या वतीने या अभियानाचे मूल्यमापन होणार आहे. यासाठी विविध वर्गवारीत गुणांचा समावेश आहे. पृथ्वीतलावरील पंचतत्त्वांनुसार निसर्गाचे संवर्धन होण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. मात्र, चाळीसगाव नगरपरिषदेचे वतीने चमको पध्दतीने हे अभियान राबविले जात आहे.या अभियानतंर्गत नगरपालिका क्षेत्रातील नदीपात्राचे स्वच्छता होऊन संवर्धन होणे गरजेचे असतांना नदीपात्रात नगरपालिका कर्मचार्यांकडून कचरा टाकला जात असल्यामुळे नदीतील पाण्याचे निचरा होत नसल्याने सर्वत्र घाण पाण्याचे डबके साचलेले आहे. त्यामुळे नदीपात्राचे विद्रूपीकरण झाले आहे .पुलाखालील मोर्यांमध्ये कचर्याचे ढीग निर्माण झाल्याने पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पाणी तुंबलेले असून त्यामुळे सर्वत्र दुर्गधी पसरली आहे.त्यामुळे माझी वसुंधरा अभियान राबवितांना जल प्रदूषण टाळण्यासाठी नदीपात्राची स्वच्छ करावी. निवेदनावर प्रा. गौतम निकम, शत्रुघ्न नेतकर, विजय शर्मा, योगेश्वर राठोड, आबा गुजर बोरसे, नाशीर भाई शेख, मिलिंद अशोक भालेराव, गणेश भोई, प्रदीप चौधरी, अशोक राठोड, आर. के. माळी सर, सागर नागणे, संदिप पाटील आदींची स्वाक्षरी आहे.