चाळीसगाव तहसील कार्यालयातून ट्रक चोरणाऱ्यास जळगावातून अटक

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तहसील कार्यालयातून वाळूचा ट्रक चोरणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील मलीक नगरातून अटक केली. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीस चाळीसगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे..

अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी अमीन शब्बीर पटेल (वय-४५, रा. पिंपळकोठा ता.एरंडोल ह.मु. पीडीडी अपार्टमेंट, मलिक नगर) हा बेकायदेशीर वाळूची वाहतूक ट्रकन करत असतांना चाळीसगाव पोलीसांनी पकडले होते. तो ट्रक चाळीसगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आला होता. याप्रकरणी ट्रक मालक अमीन पटेल यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान संशयित आरोपी पटेल याने चाळीसगाव तहसील कार्यालयात जमा असलेला ट्रक चोरून नेल्याप्रकरणी पुन्हा चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला. तेव्हा पासून संशयित आरोपी पटेल हा फरार होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी पटेल याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातील मलीक नगरातून अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाने एलसीबीचे सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, पोहेकॉ शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, महेश महाजन यांनी कारवाई केली.

Protected Content