चाळीसगाव: प्रतिनिधी । शहरात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर संचारबंदी लागू असताना पाटणादेवी रोडवरील हॉटेलात सर्रास मद्यविक्री होत असल्याची माहिती पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून सात हजारांचा मद्यसाठा जप्त केला दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला .
कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी तीन दिवसांसाठी शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र २९ मार्चरोजी सकाळी शहरातील पाटणादेवी रोडवरील पाटणाई हॉटेलात सर्रास मद्यविक्री होत असल्याची माहिती पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार सपोनि एन. ए. सैय्यद, पोकॉं संदीप भोई, मदन गोसावी व चंद्रकांत खैरनार आदींनी या हॉटेलावर सकाळी धडक कारवाई केली.
या कारवाईत ६,८४० रूपयांचा मद्यसाठा मिळून आला. अशोक वर्मा (वय-२५ ) व अमोल उसरे (वय-२३ , दोघेही रा. टाकळी प्र.चा) या हॉटेल चालकांवर शहर पोलिस ठाण्यात पोकॉं अमोल पाटील यांनी निरीक्षक यांच्या आदेशानुसार फिर्याद दाखल केली आहे. कोरोना नियमांचे पायमल्ली केल्यामुळे भादवि कलम १८८, २६९, २७० व दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) व ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि एन.ए सैय्यद हे करीत आहेत.