चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या अवळल्या

 

 

 

जळगाव : प्रतिनिधी । शहरातील शाहू नगर भागातील पिंप्राळा रोडवरील एका व्यापाऱ्यास चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. दीपक ललवानी, दीपक चव्हाण असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहे.

शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील शाहूनगर भागातील पिंप्राळा रोडवरील विलास मुरलीधर नाईक (धंदा कपाट विक्री, रा.पिंप्राळा, वाणी गल्ली) हे त्यांच्या दुकानात एकटे असताना दोन अज्ञात व्यक्तींनी हातात चाकू घेऊन जबरदस्तीने शटर बंद केले. यावेळी चाकूच्या धाकावर दोघा आरोपींनी श्री. नाईक यांच्या खिशातील एक हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच टेबलावर ठेवलेला मोबाईल उचलून पळ काढला. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा परिसरातील एका शेतात ही जबरी चोरी करणारे दोघे संशयित आरोपी असल्याची गोपनिय माहिती मिळाली. या पथकाने मुसळी फाटा परिसरातून दीपक जयराज ललवानी (वय-३२ रा. मुसळी फाटा ता.धरणगाव), दिपक भिका चव्हाण (वय-३२, रा. इंद्रनिल सोसायटी, जळगाव) या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, दिनेश बडगुजर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर यांचे पथक रवाना केले.

Protected Content