जळगाव महापालिकेचा २३१ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर

जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी विशेष स्थायी समिती सभेत सन २०१९-२०२० साठी १११७ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. कुठलीही करवाढ या अंदाजपत्रकात सुचवण्यात आलेली नाही. २३० कोटी ९२ लाख रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. अमृत योजनांचा निधी व मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निधीमुळे अंदाजपत्रकाची रक्कम वाढली आहे. आज (बुधवारी) स्थायी समितीची सभा सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मनपा प्रभारी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी अंदाजपत्रक सादर केले.

यावेळी व्यासपीठावर उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव सुनील गोराणे हे उपस्थित होते. महापालिकेचे अंदाजपत्रकात प्रारंभीची शिल्लक २३० कोटी ९२ लाख इतकी आहे. त्यात प्रत्यक्षात महापालिकेचे उत्पन्न २८० कोटी २७ लाख रुपये तसेच अनुदाने ११४ कोटी ५ लाखाची, मनपा निधी ६५ लाख रुपयांचा तसेच शासकीय निधी ४२६ कोटी ७४ लाख असे एकत्रित अंदाजपत्रक १११७ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांचे आहे. महापालिकेवर हुडको व जेडीसीसी बँकचे सुमारे ५०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. अंदाजपत्रकात कर्जफेडीसाठी सुमारे ४६ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यात हुडकोच्या कर्जाची एकरकमी फेड करण्याच्या हालचाली सुरु असल्याने त्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असल्याचे आयुक्तांनी निवेदनात म्हटले आहे. सभा तहकुब- प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी सभापती जितेंद्र मराठे यांनी सभा तहकूब केली. पुढील तहकूब सभेत स्थायी सभापतींकडून सुधारीत अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे. महापालिका मालकीच्या २० व्यापारी संकुलातील गाळ्याच्या मुदती संपलेल्या आहेत. या गाळेधारकांकडे चार वर्षांच्या भाड्यापोटी सुमारे २९६ कोटी रक्कम थतीत आहे. त्याची मागणी बिले महापालिकेने वितरीत केली आहेत. असे असतांना देखिल महपालिका मिळकतींमधून मिळणारे उत्पन्न अंदाजपत्रकात केवळ १२४ कोटी ६९ लाख ४३ हजार रुपये अपेक्षित धरणे चुकीचे असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितिन लढ्ढा यांनी सांगीतले. तसेच प्रशासनाने अंदाजपत्रक फेब्रुवारीच्या पहील्या आठवड्यात सादर करणे आवश्यक होते, असेही ते यावेळी म्हणाले.

Add Comment

Protected Content