जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीच्या गेट समोर अज्ञात तीन अनोळखी व्यक्तींनी एकाची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत रोकड आणि मोबाईल असा एकूण २२ हजार २६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश परमानंद सोनी ( वय ४३ , रा.महावीर नगर,जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ते सोनारी कारागीर असून ते सोन्याचे दागिने बनवून आपला उदरनिर्वाह करत असतात. शुक्रवारी ८ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ते त्यांची दुचाकी घेऊन शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीच्या गेट समोरून जात असताना एका तरुणाने त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर त्याला चाकूचा धाक दाखवून दुसरा आरोपी आल्यानंतर त्याने मिरचीची पावडर योगेश सोनीच्या डोळ्यात टाकली आणि झटापट झाली. यामध्ये योगेश सोनीच्या हातातील बॅग, मोबाईल आणि रोकड असा एकूण २२ हजार २६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी योगेश परमानंद सोनी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात आज्ञात तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.