आधी कामगारांची देणी अदा करा : खडका सूतगिरणी कामगारांची मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खडका येथील सूतगिरणीच्या कामगारांची देणी आधी देऊन मगच जमीन विक्री करावी अशी मागणी कामगारांच्या वतीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांना करण्यात आली आहे.

तालुक्यातील खडका येथील सहकारी सूतगिरणीची जागा विक्रीला काढण्यात आली असून याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, सदर सूतगिरणीच्या कामगारांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची भेट घेतली. सूतगिरणीची जमीन विकून जिल्हा बँक कामगारांचे पैसे देणार आहे. मात्र, या प्रक्रियेला आणखी विलंब होणार आहे. त्यामुळे जमीन विकण्यापुर्वीच कामगारांची देणी चुकती करावी, अशी मागणी कामगारांनी देवकर यांच्याकडे केली.

याप्रसंगी कामगारांनी नमूद केले की, १९९६ पासून जिल्हा बँकेने खडका सूतगिरणीला अडचणीत आणण्यास सुरूवात केली. यातच २८ मार्च १९९८ या दिवाशी वीजबील भरण्यासाठी बॅँकेने रक्कम न दिल्याने विजपुरवठा खंडीत झाला, तेव्हपासून गिरणी बंद पडली आहे. त्यामुळे कामगारांचे सुमारे साडेचार कोटी रुपये अडकले आहेत.

दरम्यान, खडका सूतगिरणी २००६ पासून शासनाच्या ताब्यात असून जिल्हा उपनिबंधक हे प्रशासक आहेत. याच वर्षी जिल्हा बॅँकेने सूतगिरणीवरील अडीच कोटींच्या कर्जापोटी ताबा नोटिस जारी करून, सूतगिरणीची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. आता सूतगिरणीच्या जागेची विक्री होत असून यातून आलेल्या रकमेतून आधी कामगारांची देणी द्यावीत अशी मागणी सूतगिरणीच्या कामगारांनी केला. यावर विचार करून संचालकांच्या बैठकीत विचार करण्यात येईल असे आश्‍वासन बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिले. याप्रसंगी युवराज पाटील, पी.एच.पाटील यांच्यासह कामगारा व कर्मचारी समन्वय समितीचे सदस्य हजर होते.

Protected Content