Home Cities जळगाव राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा वाढता धोका; अतिक्रमण हटवण्याची मागणी

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा वाढता धोका; अतिक्रमण हटवण्याची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे महामार्गाला समांतर रस्ता तयार करण्याची मागणी जळगावकरांनी वेळोवेळी केली होती. यासाठी आंदोलने, मोर्चे आणि निदर्शनेही करण्यात आली. अखेर प्रशासनाने या मागणीची दखल घेत समांतर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

परंतु, समांतर रस्त्याचे काम सुरू असताना राष्ट्रीय महामार्गावरील काही अतिक्रमणधारकांनी आपली दुकाने पुन्हा महामार्गावर आणून ठेवली आहेत. यामुळे महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय, जळगाव शहरातील अजिंठा चौकात महामंडळाने दिलेल्या बस थांब्याच्या समोरही अतिक्रमण करून काही वाहने थांबवली जात आहेत. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

महानगरपालिका, शहर वाहतूक शाखा आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या अतिक्रमण धारकांवर संयुक्त कारवाई करावी, अशी जोरदार मागणी जळगावकरांकडून केली जात आहे. महामार्गावरील अपघात रोखायचे असतील तर हे अतिक्रमण तातडीने हटविणे गरजेचे आहे. प्रशासनाने त्वरीत पावले उचलून रस्त्यावरील अनधिकृत अडथळे दूर करावेत, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.


Protected Content

Play sound