चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील घोडगाव येथील सी.बी.निकुंभ हायस्कूल येथे मुलींसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
ग्रामीण भागात महिला व मुली स्वतःच्या आरोग्यप्रती जागरूक व्हावी, त्यांना मासिक पाळी दरम्यान स्वच्छता मिळावी व त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी पाळी दरम्यान पॅड वापरले पाहिजेत. तसेच हे पॅड सहज मिळतील अशा ठिकाणी मिळावेत जेणेकरून मुलींना लाजावे लागणार नाही, या उद्देशाने शाळेतच मुलींना सॅनिटरी पॅड मिळण्याची सोय व्हावी. यासाठी चोपडा येथील इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी पुढाकार घेत शाळेत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसवून दिले आहे. हे वेंडिंग मशीन माहेश्वरी मंडळातर्फे मिळाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींची सोय होणार असून त्यांचे आरोग्य संवर्धन होण्यासाठी मदत मिळणार आहे.
यावेळी चोपडा येथील प्रथितयश महिला डॉ.वंदना पाटील यांनी मुलींना स्वच्छता व मासिकपाळी दरम्यान आरोग्यविषयक काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तर डॉ.कांचन टिल्लू यांनी मुलींच्या आरोग्य, आहार, व्यायाम याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.पी.चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले. उपशिक्षिका मीनाक्षी जैन, मनीषा पाटील यांनी ही कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी इनरव्हील क्लब चोपडा येथील सदस्या मोठया संख्येने हजर होत्या.