पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील एका ४३ वर्षीय शेतमजुराने आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील शिंदाड रहिवाशी विलास गुलाब तडवी (वय – ४३) हे आपली वृद्ध आई, पत्नी व दोन मुलांचा उदरनिर्वाह शेत मजुरी करुन चालवित होते. दिवसेंदिवस वाढणारी महागाई व हाताला काम नसल्याने आर्थिक विवंचनेतुन विलास तडवी यांनी १९ ऑक्टोबर रेाजी घरात कोणीही नसतांना घराच्या छताला गळफास लावत आपली जिवन यात्रा संपवली. सदरचा प्रकार गावातच राहणारे विलास तडवी यांचे पुतणे मुकेश तडवी यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विलास तडवी यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी विलास तडवी यास मृत घोषित करत शवविच्छेदन केले. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर. के. पाटील हे करीत आहेत. मयत विलास तडवी यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी व दोन मुले असा परिवार असुन त्यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.