गौताळा अभयारण्यातील पाच हेक्टर वनक्षेत्र जळून खाक

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव वनक्षेत्रात बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागल्याने गौताळा अभयारण्यातील नियत क्षेत्र बोढरे कक्षातील जवळपास ५ हेक्टर क्षेत्रात लागलेल्या आगीमुळे वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब ही आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तब्बल १८ तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.

चाळीसगाव वनक्षेत्रात बुधवार ६ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. गौताळा अभयारण्यातील नियत क्षेत्र बोढरे कक्ष ३१४ येथील परीसरात पुर्णपणे जळून खाक झाला आहे. वनविभागाने तातडीने धाव घेत आग विझविण्याचा शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र प्रचंड उष्णता व हवा यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. डोंगर परिसरातील मोठमोठ्या दऱ्या, दगड, धोंडे याचा सामना करत या कर्मचाऱ्यांना आग विझवताना मोठ्या प्रमाणात जखमा देखील झाल्यात मात्र क्षेत्रातील मुक्या प्राण्यांना आगीची झळ पोहचून प्राण्यांच्या जीविताची हानी होऊ नये, यासाठी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास १८ तास या दुर्गम भागात विना अन्न पाण्यावाचून आपल्या जीवाची बाजी लावून आज पहाटे ७ वाजेपर्यंत जंगलातील ही आग आटोक्यात आणली.

वनविभागाचे सर्व कर्मचाऱ्यांचे खरंतर कौतुक झाले पाहिजे कारण आज जगाला हैराण करून सोडणाऱ्या कोरोना व्हायरस या आजारातून मनुष्यप्राण्याची सुटका व्हावी यासाठी डॉक्टर, पोलीस प्रशासन, नर्सेस, सामाजिक संस्था युद्धपातळीवर काम करीत आहेत. अशाच परिस्थितीत वन्य प्राण्यांना देखील सुरक्षित राहता यावे, यासाठी वन विभागातील हे कर्मचारी वन्यप्राण्यांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता करून देण्यापासून तर अशा प्रकारचा वनवा पेटल्यानंतर प्राण्यांची जीवितहानी होऊ नये, यासाठी कुठल्याही प्रसिद्धीपासून दूर राहून काम करीत आहेत, मात्र हे कर्मचारी व त्यांचे काम फारसे जगासमोर येत नाही. आग विझवण्याच्या कामात चाळीसगाव वनविभागाचे वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी एम.डी. चव्हाण, आर. बी. शेटे, वनपाल पाटणा डी. एस. जाधव, वनपाल बोडरे महिला वनरक्षक मनीषा त्रिमाळी, कुमारी तेजस्विनी पाटील तसेच वनमजूर व लंगडा तांडा येथील मजूर यांनी मोलाचे योगदान दिले.

Protected Content